अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून सरकारी निधीचा केला गैरवापर
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर, रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामाजिक चळवळीचे नेते आणि भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे यांनी केला आहे. जनतेच्या कररूपी कष्टातून तयार होणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून सरकारी निधीचा गैरवापर केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
नाथाभाऊ यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करून केवळ दिखावा केला. मात्र, काही दिवसांतच या नव्याने बनवलेल्या रस्त्याचाही दर्जा अत्यंत खराब असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले. या प्रकरणाची तक्रार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग यांच्याकडे करण्यात आली असता, त्यांनी ठेकेदार व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
यानंतर नाथाभाऊ पाचर्णे यांनी ही तक्रार थेट मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्याकडे केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पुणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना चौकशीचे लेखी आदेश देत, तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा