पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाईत मोर्चा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वाई येथील किसनवीर चौकात समस्त वाई तालुक्यातील नागरिकांकडून एकत्र येत निषेध करण्यात आला. या हल्ल्यात प्राण गमवलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांच्यावतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी वाई येथे मूक निषेध मोर्चा काढत मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते.
यावेळी आजी-माजी नगरसेवक, विविध सामाजिक-राजकीय संघटना, सर्व पक्षीय आजी-माजी पदाधिकारी, मराठा समाज, हिंदू संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुस्लिम समाज, वाईकर नागरिक तसेच तालुक्यातील तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागणपती मंदिरापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. महागणपती मंदिर-माईसाहेब रास्ते चौक-गोविंद रामेश्वर कार्यालय-नगरपालिका-दातार हॉस्पिटल-शासकीय रुग्णालय या मार्गे किसनवीर चौक येथे एकत्र येत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत मूक मोर्चाची सांगता झाली.
यावेळी या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे. दहशतवादाला जात धर्म नसतो परंतु यावेळी दहशतवाला धर्म आहे, दाखवून दिले आहे. भारत देशाने खंबीरपणे भूमिका घ्यावी. पर्यटकांवर गोळ्या घालून अतिरेक्यांनी क्रूरपणा दाखवला आहे. हा हल्ला शेवटचा ठरला पाहिजे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या पाठीशी आहे. देशावर वाकडी नजर टाकू नये असा धडा पाकिस्तानला शिकवा, अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी बोलून दाखवल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, पाकिस्तान मुर्दाबाद, छत्रपती शिवाजी महाराज कि जय' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा