नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे ९ खोल्यावरील टिनपत्रे उडाले
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा , लव्हाळा या चार मंडळात विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने कांदा सिड्स प्लाॅट आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तर शेंदुर्जन येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे ९ खोल्यावरील टिनपत्रे उडाले असून शाळा उघड्यावर पडली आहे . प्रचंड प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ सर्वे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख ( शिंदे गट ) तथा माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे यांनी केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून साखरखेर्डा परिसरासह सिंदखेडराजा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे . ३१ मार्च रोजी शिवनी टाका , आडगाव राजा , सोनुशी , वर्दडी बु. , किनगाव राजा , दुसरबीड , मलकापूर पांग्रा परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला होता . साखरखेर्डा परिसरातही पावसाने हजेरी लावली होती . आज ३ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता विजेचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला . तब्बल ३० मिनिटे पावसाने हजेरी लावली . वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने कांदा सिड्स प्लाॅट आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . १० टक्के शेतकऱ्यांकडे गहू सोंगणी ( काढणी ) बाकी असल्याने गव्हाचे नुकसान झाले आहे . गुंज , वरोडी , शेलगाव काकडे , सावंगी भगत , सावंगी माळी , वडगाव माळी , काटेपांग्री , गोरेगाव , उमनगाव या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मुग पेरलेला असल्याने त्यालाही फटका बसला आहे.
तर उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा , सवडद , मोहाडी , शिंदी , पिंपळगाव सोनारा , तांदुळवाडी , दरेगाव , हिवरा गडलिंग , हनवतखेड , वाघाळा , शेंदुर्जन , बाळसमुद्र , गोरेगाव , उमनगाव , लव्हाळा , माळखेड , हिवरखेड , राताळी , या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे . या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
शेंदुर्जन येथेही प्रचंड प्रमाणात वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या ९ शाळा खोल्यावरील टिनपत्रे पत्यासारखी उडाली असून या शाळेतील शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे . शि . द . चौधरी प्राथमिक शाळा येथेच भरते त्याचेही नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यध्यापक राजू शिंगणे यांनी दिली आहे . जागदरी , आंबेवाडी परिसरात शेतकरी नेटची शेती असल्याने वादळी वाऱ्याने संपूर्ण नेट उडाली असून शेतकरी गजानन सांगळे , चंद्रभान सांगळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे . तहसीलदार अजित दिवटे यांनी तत्काळ महसूलचे पथक पाठवून वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाबुराव मोरे , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव , माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख , तालुका प्रमुख महेंद्र पाटील , अशोक उगलमुगले , शंकरराव उगलमुगले यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा