आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पूजन आणि लोकार्पण
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत, आणि एसटीचे अधिकारी व पंढरपूरातील प्रतिष्ठीत नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी आणि एसटी कामगार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की पुढील काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आणि मतदार संघातील नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्यादा एसटी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे. लवकरच ज्यादा एसटी बस मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंढरपूरला श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्या तुलनेत पंढरपूर आगारात बसची संख्या कमी होती, त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत असून, काही बस स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचलनाचे नियोजन करताना तारेवरची कसरत होत होती.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंढरपूर एसटीच्या ताफ्यात नवीन ५ बस दाखल झाल्या आहेत, तर पुढील काळात आणखीन ५ बस (लालपरी) दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एसटी प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा