केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ग्रीन सिग्नल
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (केदार देशमुख)सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मंगळवेढा शहरातून जातो. या मार्गामुळे मंगळवेढा ते बोराळे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असुन या महामार्गावर बोराळेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल किंवा अंडरपास करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली . याप्रश्नी खासदार शिंदे यांनी मंगळवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची निवेदन सादर केले आहे. यावर माननीय गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत मंगळवेढ्यातील प्रफुल्ल सोमदळे व विनायक उर्फ आनंद हजारे उपस्थित होते.
मंगळवेढा बोराळे रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा शहरातून जातो. या महामार्गाच्या निर्मितीवेळी मंगळवेढा बोराले या रस्त्याच्या अंडरपास अथवा उड्डाणपुलाचा समावेश होणे गरजेचे होते. मात्र तो उड्डाणपूल अथवा अंडरपास अद्यापही न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. तसेच सोलापूर हून मंगळवेढा कडे येताना मंगळवेढ्यातील उड्डाणपूलस एकूण सहा रस्ते कनेक्ट होतात, सदर रस्त्याला बायपास रोड देखील कनेक्ट होतो, बायपास वरून लोडेड 16 चाकी वाहने व एसटी देखील उड्डाणपूला खालून जातात यांना व्यवस्थित टर्न घेता येत नाही, त्यामुळे वाहनांची जाताना उड्डाणपुलाखाली कोंडी होते, या बाबीचा देखील या बैठकीत विचार करण्यात आला, यावर गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत स्वतः जागेवर जाऊन, परिस्थिती पाहून, योग्य ते रस्त्याचे अंतर वाढवावेत, जेणेकरून वाहने व्यवस्थित टर्न घेऊ शकतील आणि सुरक्षित जातील व नागरिकांचा जीव डोक्यात येणार नाही याची दखल घेण्यास गडकरी साहेबांनी आदेश दिलेले आहेत.
बोराळे हा रस्ता मंगळवेढ्यातील सर्वाधिक वापरातील रस्त्यांपैकी एक आहे. यामुळे बोराळे, अरळी, सिद्धपुर, मुंढेवाडी, राहटे वाडी, तामदर्डी, थानदरे आणि दामाजी नगर या गावांतील लोकांची सोय होते. मात्र सध्या याठिकाणी बोगदा नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच मंगळवेढा शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. बोगदा नसल्यामुळे मंगळवेढ्यातील ७५,००० लोकांना शहरात यायला-जायला ३ ते ४ किलोमीटर जास्त अंतर कापावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून जवळपास ६२,००० एकर शेतजमीनीची वहिवाट होत नसल्याचे वास्तव मांडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे खासदार शिंदे यांनी मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले.
प्रणिती शिंदे यांनी गडकरी यांच्याशी बोलताना सांगितलं की, जर या रस्त्यावर उड्डाणपूल किंवा अंडरपास झाला तर वाहतूक कोंडी कमी होईल. रस्ता सुरक्षित होईल आणि ग्रामीण भागातील लोकांना मंगळवेढा शहरात येजा करणे सोयीचे होणार आहे. या बोगद्याच्या कामासाठी सोलापूर विभागातील महामार्ग प्राधिकरणाने ८४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या प्रस्तावास तातडीने मंजूरी देऊन ग्रामीण भागातील जनतेची रस्त्याची समस्या सोडविण्याची विनंती खासदार शिंदे यांनी यावेळी नितीन गडकरी यांना केली.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत. तातडीने या कामासाठी मंजुरी देण्याचा शब्द दिला असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मेहनत घेतायत. स्थानिक लोकांना त्यांच्या या कामाचं कौतुक वाटतंय. त्यांच्यामुळे या रस्त्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा