पालकमंत्री जयकुमार गोरे यांची आढावा बैठकीत घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने पालखी तळ, विसावा व मुक्काम या ठिकाणी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध कराव्यात, या सर्व सुविधा एक महिना अगोदर झाल्या पाहिजे. मागील दोन-तीन वर्षात आषाढी वारीत प्रशासनाला आलेल्या अडीअडचणीची माहिती घेऊन त्यावर प्रथम उपाययोजना कराव्यात. वारीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते वारकरी, भाविकांना दर्शन रांग, 65 एकर, वाळवंट तसेच शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी दिशादर्शक सूचना फलक दर्शनी भागात व उंचीवर लावावेत
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहर पालखीत विसावा मुक्काम या ठिकाणी शासनाच्या वतीने उत्कृष्ट सोयी सुविधा वारकरी व भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या आषाढी वारीत पालखीतळावरून पालखी विसावा, मुक्काम घेऊन गेल्यानंतर "स्वच्छ पालखी" संकल्पने अंतर्गत त्या ठिकाणी तात्काळ स्वच्छता मोहीम स्वतंत्रपणे राबवली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पंढरपूर येथील केबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले की, आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने पालखी मार्ग, पालखीतळ, मुक्काम व विसावा ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, स्वच्छता तसेच अन्य अनुषंगिक सर्व सुविधा प्रशासनाने वारकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्या. तसेच पालखी मुक्काम किंवा विसावा ठिकाणावरून गेल्यानंतर स्वच्छ पालखी संकल्पने अंतर्गत त्या ठिकाणचे स्वच्छता स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे, असे सांगून या वारीमध्ये कुठेही अस्वच्छता दिसली नाही पाहिजे या अनुषंगाने जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनाने योग्य ते उपाय योजना राबवण्यात असे निर्देश त्यांनी दिले.
प्रशासनाने मागील दोन-तीन आषाढी वारीच्या अनुषंगाने त्यांना आलेल्या अडीअडचणीचा प्रथम अभ्यास करावा व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात. वारी कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारे वारकरी, भाविक, पालख्या व दिंड्या यांना अडचण येणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. पत्रा शेड, भक्ती सागर, वाळवंट या परिसरात शौचालये सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण कराव्यात. पालखीतळ विसावा मुक्काम ठिकाणी पालखी दिंड्या जाण्यासाठी पक्के रस्ते तयार करावे त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करावी तसेच वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधा वारी पूर्वी किमान एक महिना अगोदर पूर्ण कराव्यात. तसेच शौचालयाची साफसफाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचारी वर्ग नियुक्त करावा. महसूल, पोलीस व नगरपालिका विभागाने एकत्रित येऊन पालखी मार्ग व शहरातील अतिक्रमणे त्वरित काढावी, अशा सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.
पंढरपूर शहरात सर्व ठिकाणी वारकरी व भाविकांना दर्शन रांग, वाळवंट, 65 एकर, पत्रा शेड तसेच शहरातील अन्य ठिकाणे याची माहिती व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर दिशादर्शक सूचनाफलक तयार करावेत व योग्य उंचीवर व दर्शनी भागात लावावे. पंढरपूर शहराची स्वच्छता करून घ्यावी. एसटी स्टँडवर भाविक प्रवासांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जलसंपदा विभागाने वारी पूर्वी किमान सहा दिवस अगोदर चंद्रभागा नदीत पाणी पोहोचेल या दृष्टीने पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असेही पालकमंत्री श्री. गोरे यांनी निर्देशित केले.
आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी, वारकरी व भाविक यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने करावयाच्या उपायोजनांची माहिती व सूचना बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालकमंत्री महोदय तसेच लोकप्रतिनिधी यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन प्रशासनाच्या वतीने करून सर्व सुविधा आषाढी वारी पूर्वी उपलब्ध केल्या जातील तसेच वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासन योग्य समन्वय ठेवे ल असे सांगितले.
प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. संसारे यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन शासनाच्या वतीने आवश्यक निधीची मागणी पालकमंत्री महोदय यांच्याकडे केली.
अरण विकास आराखड्यासाठी जमिनीचे अधिग्रहण त्वरित करावे
श्री संत सावता माळी महाराज संजीवन समाधी अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेल्या चार एकर जमिनीचे भूसंपादन प्रशासनाने वेगाने करावे. अरण विकास आराखड्यासाठी शंभर कोटीचा निधी असून जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी वीस कोटींचा निधी ठेवण्यात आलेला आहे. या अंतर्गत विकास कामाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे समारक बांधणे तसेच श्री संत चोखामेळा यांचे स्मारक बांधणे यासाठी आवश्यक बाबी शासन स्तरावर करणे आवश्यक असल्याने याबाबतची लवकरच बैठक मुंबई येथे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा