मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर कारण कळेल - पशुधन पर्यवेक्षक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद देशमुख येथील शेतकरी पुंडलिक ग्यानबा चंद्रे यांच्या तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ८ शेळ्या शेतात चरत असताना अकस्मात मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
शेतकरी असलेल्या पुंडलिक ग्यानबा चंद्रे यांच्याकडे एकूण ४० शेळ्या असून त्यांचा शेळी पालन व्यवसाय आहे. दिनांक २४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान त्यांनी आपल्या सर्व शेळ्या नेहमीप्रमाणे चरण्यासाठी सोडल्या असता प्रथम त्यातील २ शेळ्यानी आकस्मितपणे मान टाकली आणि खाली कोसळल्या. अचानकपणे खाली पडलेल्या शेळ्या खाली का कोसळल्या हे पाहण्यासाठी गेले असता त्याच कळपातील इतर ६ शेळ्याही अचानक खाली कोसळल्या व जागीच गतप्राण झाल्या.
यावेळी चंद्रे यांनी येथील पशुधन पर्यावेक्षक डॉ.साहिल देशमुख व डॉ.मयूर केवट यांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी भेट देऊन हे कशामुळे झाले असेल याचे निदान करण्याकरिता मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले त्याचा रिपोर्ट अद्याप आला नसून इतर शेळ्यानाही असा अपाय होऊ नये म्हणून त्वरित लसीकरण केले.
महसूल अधिकारी पांडव यांना माहिती मिळताच त्यांनी सहाययक ढाकणे यांना सोबत घेऊन घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती कळविली आहे. यावेळी सरपंच पंढरीनाथ उबाळे, संतोष गिरी, भगवान नागरे, बाळासाहेब मुळे, प्रदीप घायवट, विलास बोडखे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा