प्रशासनाचा मात्र हलगर्जीपणा आणि डोळे झाक
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
जुन्या मार्केट यार्डसमोरील त्रिकोणी जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिरूर नगरपरिषदेने या जागेसाठी सिमेंट कंपाउंड उभारले असतानाही, काही लोकांनी या ठिकाणी लोखंडी कंटेनर, मशिनरी, लोखंडी साहित्य ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर काही लोकांनी या जागेत वास्तव्यास देखील सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या स्पष्ट आदेशानंतरही अतिक्रमण का सुरू आहे? कोणत्या अधिकाऱ्याने हे दुर्लक्ष केले? त्या जागेचा महसूल कोण वसूल करत आहे? परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही त्याचा उपयोग का केला जात नाही? या संपूर्ण प्रकाराबाबत शंका उपस्थित होत आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे आणि मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शासकीय जागेचा बेकायदेशीर वापर सुरू असताना नगरपरिषद आणि प्रशासन झोपले आहे का?” असा सवाल करत त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांमध्येही मोठा संताप असून, नगरपरिषदेने तातडीने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा