तुरुंगवासाबरोबरच 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला
शिवशाही वृत्तसेवा, महाराष्ट्र (विशेष वृत्त, प्रतीक सोनपसारे, बुलढाणा)
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. १९९५ च्या एका खटल्यात त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच माणिकराव कोकाटे यांना ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माणिकराव आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्यावर गृहनिर्माण योजनांअंतर्गत फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप होता.
काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण १९९५ ते १९९७ या काळातील आहे. यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला सरकारी गृहनिर्माण योजने अंतर्गत फ्लॅट मिळाले होते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी उत्पन्न कमी असल्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे घर नाही, म्हणून त्यांना सरकारी योजनेअंतर्गत फ्लॅट देण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अनियमितता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान ३० वर्षानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ठरवत दोघांनाही २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मंत्री आणि आमदार पदावर परिणाम होईल का ?
माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय कायद्यानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला २ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय पदाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार ?
आता माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात जाऊन या शिक्षेला आव्हान देतात की नाही ते पाहणे महत्वाचे आहे. जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय राष्ट्रवादीसाठी आणखी एक मोठी समस्या बनू शकते. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे वादात सापडले आहेतच त्यात आता माणिकराव कोकाटे यांची भर पडली आहे. छगन भजबल या घटनेकडे कसे बघतात.. यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते इकडे मात्र राजकीय जाणकारांचे लक्ष लागले असेल. कारण माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात असलेले वितुष्ट जगजाहीर आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा