नातवंडांना लाभले आजी-आजोबांचे प्रेम - लोणंद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुली ,तालुका खंडाळा येथील धनंजय जाधव सर आणि मृणाल जाधव मॅडम यांनी एक अनोखा उपक्रम राबविला. आजच्या 21 व्या शतकात आजी आजोबांचे प्रेम खूप कमी मुलांना लाभत आहे. नोकरी, व्यवसाय ,विभक्त कुटुंब पध्दत यामुळे नातवंडे आणि आजी आजोबा यांच्यातील नात्याचा ओलावा कमी झालेला पाहायला मिळतोय.
आज आनंददायी शनिवार अंतर्गत शाळेमध्ये या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, आजी आजोबांचे स्वागत त्यांच्या नातवंडांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर जाधव मॅडम यांनी प्रार्थना गायन केले यावेळी सर्वजण लहानपणी च्या आठवणीत हरवल्याच जाणवलं. अनेक आपल्या नातवासोबत शाळेमध्ये डबा खाण्याचा आनंद आजी आजोबांनी लुटला, त्यांना घास भरवत असताना आपोआप त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले.
नातवासोबत आपणही लहान आहोत याची जाणीव प्रत्येकाला झाली, संसार ,कर्तव्य ,जबाबदारी यातून जरा बाजूला होऊन काहीं क्षण जगावेत असे प्रत्येकाला वाटलं.कार्यक्रम संपेपर्यंत कोणीही मोबाईल वापरला नाही सर्व विसरून उपक्रमाचा आनंद घेतला. यानंतर आनंददायी खेळ घेण्यात आले प्रत्येक आजी आणि आजोबा आपले वय विसरून आनंदाने खेळ खेळत होते. काही आजींनी पारंपरिक उखाणे घेतले, कविता सादर केल्या, नाट्यछटा सादर केल्या, आजोबांनी उस्फूर्तपणे अभंग,गवळणी ,ओव्या सादर केल्या यातून आपला वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचण्यास मदत झाली.
आजी आजोबांनी तीन पिढ्यातील फरक सांगितले, स्वानुभव ,बदलेल वातावरण, नातेसंबंध यावर उपाय फक्त संस्कारित पिढी निर्माण करणे. शिक्षणाबरोबर आजी आजोबांची अनुभवाची शिदोरी नातवंडांच्या आयुष्यात असावी. तीन पिढीतील अंतर कमी होऊन नातेसंबंध सुधारण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल असे अनेकांनी व्यक्त केले
यावेळी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था फलटण चे अधिव्याख्याता मा कृष्णा फडतरे, मा. केंद्रप्रमुख शिवाजी साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपालीताई रवींद्र क्षीरसागर, मुख्याध्यापिका छाया पांडुरंग क्षीरसागर, पत्रकार रमेश धायगुडे, पत्रकार गणेश भंडलकर ,आजी आजोबा आणि विद्यार्थी उपस्थित होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा