१२५० विद्यार्थ्यांनी सादर केला गीत मंच अर्थात - गीत बहार हा समूहगीतांचा अविष्कार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द ह कवठेकर प्रशालेत गीत बहार समूहगीतांचा अविष्कार हा कार्यक्रम पार पडला. दिनांक 31 जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात शाळेतील सुमारे 1250 विद्यार्थ्यांनी एका सुरात सादर केलेल्या विविध गीतांनी उपस्थितिसांची मने जिंकली.
गीत मंचासाठी संगीत तज्ञ डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व संगीत अलंकार सौभाग्यवती आसावरी पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर, सचिव सू. र.पटवर्धन, निवृत्त पर्यवेक्षिका वै.सु. पटवर्धन, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती प्रतिमा पूजन आणि वाद्यपूजन पार पडले. मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संगीत शिक्षक राजेश खिस्ते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रशालेतील सुमारे 1250 विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सामूहिक सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी गीते, समाज प्रबोधन पर गीते अशा गाण्यांचे सूर प्रशालेच्या प्रांगणात उमटले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एका सुरात समूहगीत सादर करत होते. त्यावेळी सुर ताल आणि लय यांचा सुरेख संगम अनुभवास आला. गीत सादर करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक समाधान होते. तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवाऱ्यांमुळे विद्यार्थी सुरांच्या सागरात तल्लीन झालेले दिसून आले. संगीत शिक्षक राजेश खिस्ते, यु.एल. केसकर, व गोसावी मामा यांनी संगीत साथ केली. विद्यार्थ्यांच्या या समूहगीत सादरीकरणामुळे उपस्थित सर्वच जण रंगून गेले होते.
प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व आसावरी पटवर्धन यांनी आपल्या मनोगत या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करतानाच त्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन देखील केले. या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. दिवाण व सौभाग्यवती ए.जे.आयाचित यांनी केले तर पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. पसायदान सादर झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा