तंटामुक्त समिती अध्यक्षाला घातला घेराव
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीसाठी महिलांनी वेळोवेळी आंदोलने केली, पोलीस स्टेशनला तक्रारी अर्जही दिले. तरीही गावात खुलेआम दारू विक्री सुरू असल्यामुळे वैतागलेल्या खेडभोसे गावातील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांना घेराव घालून गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी, अशी मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावामध्ये खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे. याचा त्रास गावातील महिलांना मोठ्या प्रमाणात होत होता. त्यास वैतागून महिलांनी करकंब पोलीस ठाणे, उत्पादन शुल्क विभाग, पंढरपूर, तहसीलदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. निवेदन दिल्यानंतर काही दिवस गावातील दारू विक्री बंद झाली.
मात्र सध्या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून गावामध्ये सातत्याने भांडण तंटा होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दारूबंदी व्हावी, यासाठी ठराव सुद्धा केला आहे. तरीसुद्धा गावातील दारू विक्री बंद होत नसल्याने वैतागलेल्या महिलांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांना घेराव घालून दारूबंदी करण्याची मागणी केली.
याबाबत लवकरच ग्रामसभा घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांनी दिला आहे.
माझा नवरा रोज सकाळी गावात दूध डेअरीला दूध घेऊन गेल्यावर दारू पिऊनच माघारी येतो. त्यामुळे आमच्या घरात दररोज भांडणे होत आहेत. एकतर गावात दारू बंदी करा, अन्यथा आम्हाला त्या दारू विक्रेत्याच्या दुकानापुढे फाशी घेण्याची परवानगी द्या, अशी संतप्त मागणी यावेळी महिलांनी केली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा