राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास तसेच प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही. राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर, निर्मिती व विक्री करू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. खराब झालेले, राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करुन नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावेत असे आवाहन प्रांताधिकारी इथापे यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा