उपस्थित कार्यकर्त्यांन मध्ये जल्लोषात नवचैतन्याची लाट
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई विधानसभा मतदारसंघाला वेगळी परंपरा आहे.तुमच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांना भरभरून दिले मात्र पक्ष फुटल्यानंतर जे सोडून गेले,अशा गद्दारांना पाडा पाडा पाडा..असे ठाम राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सौ अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाई भाजी मंडई येथे झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते.यावेळी सौ.अरुणादेवी पिसाळ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,प्रसाद सुर्वे,शिवसेना उबाठा गटाचे स्टार प्रचारक किरण माने,प्रा.दिलीप जगताप,सौ.लक्ष्मी कऱ्हाडकर,डी एम बावळेकर,विराज शिंदे,डॉ नितीन सावंत, ऍड निलेश डेरे,तारिक बागवान, जयदीप शिंदे,रामदास कांबळे,नंदकुमार घाडगे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खा.शरद पवार म्हणाले,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून लक्ष्मणराव पाटील आमच्या सोबत होते.त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार जोपासला.मधल्या काळात भाजपा ने पक्ष फोडाफोडीचे राजकारण हाती घेतले.तेव्हा राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली.त्यावेळी अनेकजण आम्हाला सोडून गेले.त्यांनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी श्रीनिवास पाटील यांच्या सोबतीने कराडला जात असताना मकरंद पाटील स्वतः मला भेटले.माझ्या गाडीत बसून कराडला आले.मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबरच राहीन असे मला त्यांनी ठासून सांगितले. पण दुसऱ्या दिवशी हा गडी गायब झाला.मी माहिती घेतली तर त्यांनी मला कारखान्याचे दुखणं असल्याचे कारण दिले.मी म्हंटल आपण मार्ग काढू पण त्यांनी माघार घेतली नाही,आमचा निर्णय झालाय.असे सांगितले
आम्ही पाटील कुटुंबाला काय दिले नाही. लक्ष्मण तात्यांना दोन वेळा खासदार केले,तर यांना गावच्या सरपंच पदापासून तीन वेळा आमदार केले.किसनवीर कारखान्याचे चेअरमन केले,भावाला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद,आता राज्यसभेचे सदस्यत्वपद पण मिळाले,गावचे सरपंचपद पण यांनाच पाहिजे.जे दिसलं ते आपलंच म्हणण्याची भूमिका त्यांची आहे.लक्ष्मणतात्या असते तर ही वेळ आज उदभवली नसती.
साहेब आमचे दैवत आहेत,साहेबांशी आमची निष्ठा आहे, साहेब आमच्या हृदयात आहेत अन आमच्या खिशातही साहेबच आहेत,असे मकरंद पाटील सर्वत्र सांगत असल्याचे निदर्शनास आणून पवार साहेबांनी तुमच्या खिशात किंवा हृदयात बसण्याएवढी माझी उंची नाही,अशा शब्दांत उपरोधिक टीका केली.
किसनवीर आबा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, विठ्ठलराव जगताप, प्रतापराव भोसले यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाची वाईला परंपरा आहे. मदनराव पिसाळ यांनी समाजहिताचे राजकारण केले. या मतदारसंघातील मतदार कधीही जातीयवादी धर्मांध शक्तींना साथ देणार नाही अशी मला खात्री आहे.
स्त्रियांना संधी मिळाली तर त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात.सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मतदारसंघात आम्ही अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे.तरुणांच्या हाताला काम,महिलांचे स्वावलंबन,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक,औद्योगिक विकासासोबतच स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरुणादेवी पिसाळ यांना विजयी करा,त्यांच्या पाठीशी आमची शक्ती आणि ताकत उभी आहे.
अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या,यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विचार जोपासताना कै.मदनराव आप्पा पिसाळ यांनी 20 वर्षे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे समाजकारण व राजकारण केलं.त्यांनी धोम बलकवडी व नागेवाडी धरण उभारून दुष्काळी भागाला पाणी देण्यास अग्रक्रम दिला.त्यांच्याच आदर्श विचारांचा वारसा घेऊन मी काम करेन.सरपंच पदापासून आमदार खासदार पदापर्यंत सर्वच पदे आपल्या घरात घेणाऱ्या आमदारांना मतदासंघातील तीनही तालुक्यात एकही लायक व्यक्ती न भेटला नाही का असा सवाल यावेळी उपस्थित केला.महाविकास आघाडीने आपल्या पंचसूत्री मध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांचे प्रश्न पर्यटन विकास तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करण्या साठी मी कटिबद्ध राहीन.मला एकदा संधी द्या मी महिला म्हणून कुठेही कमी पडणार नाही,संधीचे सोन करून दाखवेन.
किरण माने म्हणाले,पेशवाई मोगलाई नंतर राज्यातील महायुती सरकारने गद्दारांना व भ्रष्टाचाऱ्यांना खतपाणी घालत आहेत.स्वाभिमानी जनता त्यांनी निश्चित जागा दाखवुन देईल. संविधानाने तुम्हाला ताकद दिली आहे.महिलांना सुरक्षितता देण्याऐवजी १५०० रुपयांची भीक देणाऱ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका.
यावेळी सुनील माने,रमेश धायगुडे पाटील, दिलीप बाबर,अल्पना यादव,समाधान कदम,दिगंबर गाढवे,ऍड प्रताप देशमुख,यशराज भोसले, आदींची यावेळी भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या प्रचार गीताने सभेची सुरुवात झाली. दिलीप बाबर,विजयसिंह पिसाळ जयदीप शिंदे, यांनी स्वागत केले.जयदीप शिंदे यांनी आभार मानले.
१९८० साली ५८ आमदार फुटले तेव्हा आम्ही परत निवडणूकीला सामोरे गेलो,तेव्हा ५८ मधील एकही उमेदवार परत निवडून आला नाही,महाराष्ट्र कधीही गद्दारांना थारा देत नाही,अशी आठवण पवार साहेबांनी यावेळी आवर्जून सांगितली
कर्तृत्वाचा ठेका फक्त पुरुषांकडे असतो हे खरं नाही,संधी मिळाली तर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवतात,असे सांगून पवार साहेब यांनी देशातील सर्वाधिक खणखर स्त्री म्हणून आजही इंदिरा गांधींचा उल्लेख होतो असे सांगितले.तर माझी मुलगी 4 वेळा संसदेत निवडून गेलीय,लोकसभेतील हजेरी आणि कामगिरी मध्ये ती देशात नंबर दुसऱ्या नंबरची आहे.अरुणादेवी यांच्या मध्ये तीच कुवत असल्याने त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून उठावदार कामगिरी केली.विधानसभेतही त्या अशाच कर्तबगार कामगिरी करतील अशी मला खात्री असल्या चे शरद पवार म्हणाले
वाईंमध्ये एका लग्न संभारंभाला मी गेलो होतो तेव्हा लोकांनी मला उत्स्फूर्त प्रतिसादाच्या घोषणा दिल्या,ही वाई साधी सुधी नाही,दिसती तशी नाही,एकदा फिस्कटल तर दुरुस्त होणारी नाही.लोकांचे जनमत काय आहे हे स्पष्ट झालं.लोकांचे मत आणि मन न जाणता जे लोक निर्णय घेतात त्यांचे राजकारण संपत. मकरंद पाटील म्हणतात साहेब माझ्या हृदयात आहेत,माझी निष्ठा साहेबांशी,साहेब माझे दैवत,मी साहेबांच्या अंतकरणात आहे.अरे।किती ठिकाणी मला जागा देताय,मी किती ठिकाणी बसू?आमचं आता नक्की ठरलंय की अरुणा देवींना विजयी करायच अन या गद्दारांना घरी बसवायचं..असे आवाहन करून शरद पवार यांनी अरुणा देवींचा हात उंचावून विजयाची खात्री करून घेतली
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा