'एकदा काय झालं' चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा, राज्यशासनाची सहा नामांकने जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
डॉ.सलील कुलकर्णी यांना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'एकदा काय झालं' या चित्रपटासाठी २०२३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. हा त्यांनी दिग्दर्शित केलेला दुसराच चित्रपट आहे. आता याच चित्रपटासाठी पुन्हा एकदा त्यांना राज्यशासनाची तब्बल सहा नामांकने प्राप्त झाली आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा (डॉ.सलील कुलकर्णी), सर्वोत्कृष्ट संगीत (डॉ.सलील कुलकर्णी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (सुमीत राघवन), सर्वोत्कृष्ट गीतकार (संदीप खरे), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (शुभंकर कुलकर्णी) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशी नामांकने मिळाली आहेत.
डॉ. सलील कुलकर्णी हे नाव म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम! या कार्यक्रमाने आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गाण्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलंच आहे. फक्त गायक म्हणूनच नव्हे, तर डॉ. सलील कुलकर्णी हे उत्तम लेखक, गीतकार आणि लोकप्रिय दिग्दर्शक म्हणूनही आपल्याला परिचित आहेत. राष्ट्रीय पुरस्कारानंतर आता राज्य शासनासाठीही या चित्रपटाला सहा नामांकने प्राप्त झाली आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे, डॉ.सलील आणि शुभंकर या बापलेकाच्या जोडीला एकाच वर्षी एकाच चित्रपटासाठी नामांकने मिळाली आहेत, हा सुवर्णयोगच! यापूर्वी शुभंकरला 'एकटी एकटी घाबरलीस ना' या गाण्यासाठी बालगायक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले होते. आता एक तरुण गायक म्हणून हे नामांकन मिळालं आहे. 'एकदा काय झालं' या चित्रपटातील 'श्याम आणि राम' या गाण्यासाठी त्याला हे नामांकन मिळालं आहे.
'एकदा काय झालं' हा डॉ.सलील कुलकर्णी दिग्दर्शित आणि निर्मित २०२२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. या चित्रपटात सुमीत राघवन, ऊर्मिला कोठारे, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, अर्जुन पूर्णपात्रे आणि सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
---------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा