पत्रकारितेचे पावित्र्य जपत साप्ताहिक आपलं नांदेड ने जिल्ह्यात अव्वल स्थान निर्माण केलं - मारोतराव कवळे गुरुजी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
धर्माबाद सारख्या छोट्याशा तालुक्यातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात करणारे संपादक शिवराज पाटील गाडीवान यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी आपलं नांदेड या साप्ताहिकाची निर्मिती करून वर्तमानपत्राच्या क्षेत्रात एक विश्वसनीय दर्जेदार बातम्या देणाऱ्या संपादकामध्ये आपले नाव कोरले असून अल्पावधीतच आपलं नांदेड जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचे साप्ताहिक झाले असून निर्भीड आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी वाचक आपलं नांदेडची वाट पाहतात असे उद्गार व्ही पी के उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी साप्ताहिक आपलं नांदेडच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या अध्यक्ष समारोप करताना म्हणाले.
दिनांक 27 मे रोजी सकाळी 11 वाजता धर्माबाद शहरातील श्रीराम फंक्शन हॉल येथे मोठ्या भव्यतेने नांदेड जिल्ह्यातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत साप्ताहिक आपलं नांदेडचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हीपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, व्यंकटेश जोशी, रामचंद्र पाटील बंन्नळीकर, दत्ताहरी पाटील चोळाखेकर, नागभूषण वर्णी, सखाराम निलावार, रवींद्र पोतगंटीवार ,गणेश गिरी जयवंतराव जोंधळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी वर्तमान पत्र जगताचे दैवत आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांचा आपलं नांदेड साप्ताहिकाचे संपादक शिवराज पाटील गाडीवान व अशोक पाटील वडजे यांनी शाल पुष्पहार देऊन सन्मान केला त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक शिवराज पाटील गाडीवान यांनी केले वाचन संस्कृतीकडे होत असलेले युवा पिढीचे दुर्लक्ष हे वर्तमानपत्रासाठी खूप मोठी हानी आहे असे आपल्या मनोगततून व्यक्त करत वाचन संस्कृती टिकली पाहिजे तरच वर्तमानपत्रे टिकतील असेही ते म्हणाले यानंतर रामचंद्र पाटील बनाळीकर ,वेंकटेश जोशी, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे ,गणेश गिरी ,सखारामजी निलावार ,यांची समायोजित भाषणे झाली.
साप्ताहिक आपलं नांदेडच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा विशेष अंकाचे सर्व मान्यवरांचे हस्ते विमोचन झाल्यानंतर संपादक शिवराज पाटील गाडीवान यांचा संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते सामूहिक सत्कार करण्यात आला यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुरेख दर्जेदार सूत्रसंचालन पत्रकार सतीश पाटील शिंदे यांनी केले. यावेळी धर्माबाद तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाची पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा