लग्नसराईमुळे प्रवाशी संख्येत मोठी वाढ
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - सद्यस्थितीत उन्हाचा कडाका वाढला आहे. तालुक्याचे तापमान ४० अंशां जवळ पोहोचले आहे. अशातही एसटी बसेस मात्र प्रवाशांनी खच्च भरून धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लग्नसराईचे दिवस असल्याने बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने, आता खासगी वाहनांचाही आधार प्रवाशांकडून घेतला जात आहे.औंढा नागनाथ तालुक्यात मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्याचा जनजीवनावर काही प्रमाणात परिणामही दिसून येत आहे. तथापि, सद्यस्थितीत लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. औंढा नागनाथ बसस्थानकातून धावणारी प्रत्येकच बस प्रवाशांनी खच्च भरून धावत आहे.
एसटीच्या प्रवासात अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. तर महिलांना सरसकट ५० टक्के सवलत लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासीसंख्येत आधीच वाढ झाली . त्यात आता लग्नसराई सुरू असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत एसटीच्या प्रवाशी संख्येत अधिकच वाढ झाली आहे. एकीकडे उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाही एसटीच्या प्रवासाला सवलतधारक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच रखरखत्या उन्हातही एसटीची लालपरी प्रवाशांनी खच्च भरल्याचे दिसते.
काहींची खासगी वाहनांकडे धाव
शासनाने एसटीच्या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० टक्के, तर महिलांसाठी सरसकट ५० टक्के सवलत दिल्यानंतर खासगी वाहनांकडे प्रवाशांनी पाठ केली होती. त्यामुळे खासगी वाहन चालक, मालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. आता मात्र, एसटीच्या प्रवासी संख्येत अधिकच वाढ होत असताना आसन मिळणे कठीण असल्याने पूर्ण तिकीट देऊन प्रवास करणारे काही प्रवासी मात्र खासगी वाहनांचा आधार घेत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा