लग्न समारंभावरुन परत येताना घडली दुर्देवी घटना
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
एका लग्न समारंभासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या साले व मेहुणे यांची दुचाकी अंढेरा फाट्यानजीक भरधाव असतानाच घसरली. त्यामुळे दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना देऊळगावमही येथे नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यातील सालेबुवा ठार झाल्याची माहिती दिली. तर मेहुण्याची तब्येत गंभीर असून, वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर अन्य एका अपघातात, अंचरवाडी फाट्याजवळ एका दुचाकीला भरधाव आयशरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला चिखली येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आलेले आहे.
सविस्तर असे, की आज सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान अंढेरा फाट्यावरुन अंढेरा गावाकडे भरधाव जाणार्या दुचाकीस्वारांची दुचाकी अचानक स्लीप झाली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तात्काळ पुढील उपचारासाठी देऊळगावमही येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मूळचे बायगांव बुद्रूक येथील रहिवासी असलेले व एका खासगी कंपनीत छत्रपती संभाजीनगर येथे कामाला असणारे हे साले मेहुणे हे लग्न समारंभासाठी गावी आले होते. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान अंढेरा फाट्यावरुन बायगांव बुद्रूककडे जात असताना पारधीवस्तीजवळ भरधाव पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.२० सीक्यू ८३२४) ही स्लीप झाली होती.
या अपघातात दुचाकीचालक मेहुणे राधेश्याम पवार (रांजणगाव) हे गंभीर जखमी झाले असून, पाठीमागे बसलेले साले प्रदीप विजय चव्हाण रा.बायगांव बुद्रूक याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तत्काळ धोत्रा नांदई येथील जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या अॅब्युलन्सने देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार असून, त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुसर्या एका दुर्देवी घटनेत, अंचरवाडी फाट्याजवळ वसंतनगरजवळ एका दुचाकीला भरधाव आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वारास डोक्याला जबर मार लागलेला आहे. त्याला तातडीने चिखली येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले असून, या अपघाताचा तपशील लवकरच प्राप्त होणार आहे. हे वृत्तलिहिपर्यंत त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाले असून, अंढेरा पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा