तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या नेतृत्वात महसूल विभागाची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे तीन ब्रॉस आणि किनगाव राजा येथे एक ब्रॉस रेती असलेले टिप्पर असे एकूण दोन टिप्पर तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने १६ फेब्रुवारी रोजी पकडून दंडात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती वाहतूक व उत्खननाला प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार जयस्वाल आणि त्यांचे पथक रात्री गस्त घालण्यासाठी गेले असता पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास मलकापूर पांग्रा येथे एम. एच. २८, बीबी ७५७७ या क्रमांकाचे तीन ब्रॉस अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले. यावेळी वाहनचालक गणेश गजानन बुरकुल (रा. आगेफळ) यांच्याकडे रेती वाहतूक परवाना आढळून आला नाही.
त्यांच्या सांगण्यावरून वाहनमालकाचे नाव कारभारी बापूराव मुरकूट (रा. ढोरव्ही) असल्याचे सांगितले, सदर वाहन साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाईसाठी लावण्यात आले. त्यानंतर किनगाव राजा येथे सकाळी ८.१० वाजता एम. एच. २८, बीबी ४१८२ या क्रमांकाच्या टिप्परमध्ये एक ब्रॉस अवैध रेती वाहतूक करताना पकडले, वाहनचालक लक्ष्मण माधवराव काटकर याच्याकडे रेती वाहतूक परवाना आढळून आला नाही. त्यांच्या सांगण्यावरून वाहनमालकाचे नाव रामेश्वर अश्रुबा भालेकर (रा. हिवरखेड पुर्णा) असे सांगितले. सदर वाहन पकडून किनगाव राजा पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाईसाठी लावण्यात आले आहे. तहसीलदार जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने रेती माफियांमध्ये दहशत पसरली आहे. यावेळी पथकात तलाठी प्रशांत पोंधे, आनंद राजपूत, तलाठी घरजळे, पंजाबराव ताठे आदीनी सहभाग घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा