अर्धवेळ परिचारिका भरतीबाबत ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली - किनगावराजाच्या वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई

सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांचा उपोषणाचा इशारा
Santosh Darade's hunger strike warning , Action against Kingaon Raja's Medical Officer , Sindkhedaraja , shivshahi news.

सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा ग्रामपंचायतीने ग्रामसभेद्वारे पाठवलेला ठराव अव्हेरून अर्धवेळ परिचारिका नियुक्तीस टाळाटाळ करणारे किनगावराजाचे वैद्यकीय अधिकारी विनोद शिंगणे यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांना निलंबीत करण्यात यावे, अन्यथा ८ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद बुलढाणासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे हिवरखेड पूर्णा येथील अर्धवेळ परिचारिका पदभरतीचे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावराजा येथील वैद्यकीय अधिकारी विनोद शिंगणे यांनी अर्धावेळ परीचारिका या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालय हिवरखेड पूर्णा यांना भरती प्रक्रिया राबवण्यासाठी दिनांक २६/०९/२०२३ रोजी पत्र दिले होते. ग्रामपंचायतीने या पत्राच्या अनुषंगाने दिनांक ३०/११/२०२३ रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ग्रामसभेमध्ये दोन महिला पात्र करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे प्रस्ताव वैद्यकीय अधिकारी किनगावराजा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले होते. हिवरखेड पूर्णा येथे अर्धी वेळ परिचारीका हे पद बरेच दिवसापासून रिक्त झालेले आहे. ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करून दोन महिने पूर्ण झाले तरी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावराजाचे वैद्यकीय अधिकारी विनोद शिंगणे यांनी या पदभरतीबाबत कार्यवाही केली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांनी चौकशी करण्यासाठी गेले असता, त्यांची दिशाभूल करून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. 
तसेच, एक जुना २०१२ चा जीआर असून त्या जीआरमध्ये फेरनियुक्ती करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे सांगण्यात आले. याबाबत संबंधितांनी या प्रकरणांमध्ये देणंघेणं करून हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे. ग्रामसभेला व ग्रामपंचायतला हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची किंमत राहिलेली नसून, संबंधित अधिकार्‍याने आरोग्य विभाग हा एक किराणा दुकान करून ठेवला आहे. त्यामुळे दिशाभूल केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी शिंगणे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व कायदेशीर गुन्हा दाखल न झाल्यास दिनांक ०८ /०२ /२०२३ रोजीपासून जिल्हा परिषद बुलढाणासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी सीईओ, बुलढाणा यांना दिले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !