अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे 'अभिता ऍग्रो एक्स्पो' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मेहकर रोडवरील मातोश्री लॉन्सच्या बाजूला १२ ते १५ जानेवारी दरम्यान हे भव्य प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी २९ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिंदखेड राजा हे राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो एक्स्पो २०२४ हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आगामी वर्षातील हा भव्य कृषी महोत्सव असेल, असा विश्वास सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केला. बुलडाणा हा कृषी उत्पादनात राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात सोयाबिन, कापुस, तुर, बाजरी, ज्वारी, गहू आणि कडधान्ये ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. बुलढाणा हा महाराष्ट्र राज्यातील १३ तालुके असलेला जिल्हा आहे. कृषी उत्पादनामध्ये सर्वात मोठा तालुका सिंदखेड राजा आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये २११०२७ लोकसंख्या असलेली १०८ गावे आहेत. सिंदखेड राजाला लागून १५ किमी अंतरावर देऊळगाव राजा तालुका आहे. या तालुक्याची लोकसंख्या १२०९८९ आहे. जवळच २३ किमी अंतरावर जालना हा जिल्हा आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनास दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे व्यवस्थापन बालाजी मल्टीमिडीया इव्हेंट्सचे नरेन काकडे यांच्याकडे असणार आहे. या कृषी प्रदर्शनात राज्यातील सुमारे २०० ते २५० स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. कृषी क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान, कुक्कुटपालन आणि पशुधन, दुग्धव्यवसाय, कृषी सेवा आणि अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान इत्यादीचे प्रदर्शन करण्यासाठी एकाच छताखाली एक उत्कृष्ट विचारपीठ उपलब्ध होणार आहे.अमरावती, अकोला, जालना, हिंगोली, वाशीम, यवतमाळ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील स्टॉलधारक आपले योगदान देणार आहेत.
महाष्ट्रातील शेतकरी अनेक पिके घेतात. परंतु अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांना पारंपारिक पद्धतीचा वापर करून उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यात अडचणी येतात. शेतीच्या पारंपारिक पद्धतींचा वापर करताना, उच्च तंत्रज्ञान आणि निविष्ठा तसेच प्रगत उत्पादन पद्धती, लॉजिस्टिक्स आणि मार्केटिंगचा संपर्क त्यांना योग्य पद्धतीने विकसित करण्यास मदत करेल. महाराष्ट्राचे उत्पादन, प्रगत तंत्रज्ञान आणि कृषी सामर्थ ठळकपणे दाखवण्यासाठी हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य कृषि प्रदर्शन आहे.आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतक-यांना करून देण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. संवादाद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी संबंधीत अनेक महत्वाच्या २०० हुन अधिक कंपन्यांचा व संस्थांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेड राजा, जिल्हा परिषद कृषी विभाग रेशिम व मधुमक्षिका उद्योग, सहकार विभाग, पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग केंद्र, कृषी समिती जि.प. बुलढाणा, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रदर्शनात शासकीय सहभाग असणार आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी पर्वणी असणार आहे. या प्रदर्शनात अनेक आकर्षण असणार आहेत. अधिक माहितीकरीता ९८६७५१५६३७, ९९७५५४५१३७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण
1) एक दिवसीय पशु-पक्षी प्रदर्शन
2) कृषि तज्ञांची व्याख्याने व कार्यशाळा
3) प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ
4) सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा
5) राष्ट्रीय बागवानी मंडळांच्या विविध योजना.
6) खते, जैविक खते आणि शेतीच्या नव नवीन पध्दती
7) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपन्यांची बी बीयाने व खते, पाणी व्यवस्थापन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन योजना व अनुदानांची माहिती
8) पशूपालन आणि पशू उत्पादने व दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री इत्यादी विषयक यंत्रन व उत्पादने
9) कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, रेशिम उद्योग, शेतीवर आधारीत व्यवसाय व उद्योगांची माहीती
10) फळ व फुले उत्पादनसंबंधीत विविध पध्दती व आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक फवारणी यंत्रे
11) कृषी अर्थसहाय्य व वितरण व्यवस्था, अन्नप्रक्रिया पॅकेजिंग स्टोरेज, वाहतुकीची कृषी उपयोगी वाहने
12) ऊस व हळद लागवड व्यवस्थापन व प्रक्रिया कोरडवाहू शेती व व्यवस्थापन, ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन
13) शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या सरकारी वा बिगरसरकारी संस्था ग्रामीण निवास व्यवस्था व त्यासाठी लागणारी उत्पादने
14) औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची कृषि अवजारे ट्रॅक्टर चलीत अवजारे, ट्रॅक्टरचे विविध मॉडेल्स, फवारणी यंत्र, रोटाव्हेटर
15) बैल चलित अवजारांची प्रात्यक्षिके
16) राज्यातील २ ते २.५ लाख शेतकऱ्यांची कृषि प्रदर्शनाला भेट
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा