जालन्याच्या पुढे हिंगोली पर्यंत चालवण्याची मागणी
गाडी संख्या 12071/72 मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा पुर्णा- परभणी -वसमत मार्गे हिंगोली पर्यंत तात्काळ विस्तार करण्यात यावा, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रेल मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी दक्षिण मध्य रेल्वेच्या 8 ऑक्टोबर 2022 रोजी बेंगलोर येथे झालेल्या मीटिंगमध्ये हिंगोली पर्यंत विस्तारित करण्याची शिफारस करण्यात आलेली होती. परंतु खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांनीच सदरच्या रेल्वे गाडीला हिंगोलीला येण्यास अडचण निर्माण केलेली आहे. सदर रेल्वेगाडी हिंगोली पर्यंत विस्तारित करण्यात यावी म्हणून अनेकदा मागणी करण्यात आली. यावर मोठे आंदोलन हिंगोलीत करण्यात आलेले होते. रेल्वे रोको आंदोलन केल्याने अनेक जणांवर गुन्हे पण दाखल झालेले आहेत.
या जिल्ह्यातील, भागातील लोकांची या मागणी बद्दल असलेली तीव्रता बघून हिंगोली करिता बंद पडलेली अजनी कुर्ला टर्मिनस एक्सप्रेस ऐवजी नांदेड-कुर्ला टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. परंतु सदर रेल्वेगाडीच्या चुकीची वेळ व नेहमी होणारा उशीर यामुळे या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. या सबबीखाली पुन्हा सदरची रेल्वे गाडी बंद करण्यात आलेली आहे. या रेल्वे गाडीचे वेळापत्रक पाहता कोणालाही उपयुक्त नसणारे वेळापत्रक विभागाने जाणून-बुजून लादल्याने त्यावेळेसच ही गाडी बंद होणार हे अधोरेखित झालेले होते.
आणि झालेही तसेच आता जालनाकरांना वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे व मुंबई करता स्वतंत्र रेल्वे पण मिळालेली आहे. त्यामुळे जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोली पर्यंत करण्यात यावा अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आलेली आहे. जर ही मागणी विचारात घेतली नाही तर हिंगोलीकरांना परत आंदोलन उभारावे लागेल असे ठणकावण्यात आले आहे. यासंदर्भात विचार विनिमय करून आंदोलनाची रूपरेषा ठरविण्या करता दिनांक एक जानेवारी रोजी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहावर व्यापारी, पत्रकार व नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने रेल्वेमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनावर अनिल नैनवाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप चव्हाण ,जगीतराज खुराना , गजेंद्र बियाणी, सुरेशअप्पा सराफ, संजय देवडा, रवींद्र सोनी, सुमित चौधरी, आशिष पोरवाल, इत्यादीच्या साक्षरी आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा