जगभरात बायोमेडिकल वेस्ट व त्याची विल्हेवाट हा भीषण प्रश्न
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
येथील संशोधक पुष्यमित्र केशव जोशी याला त्याचे संशोधन बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट पर्यावरण पूरक पध्द्तीने करण्याच्या यंत्र व प्रक्रियेला नुकतेच भारत सरकारद्वारे पेटंट मंजूर करण्यात आले.
संपूर्ण जगभरात आज घडीला बायोमेडिकल वेस्ट व त्याची विल्हेवाट हा भीषण प्रश्न आहे. भारतात दरदिवशी सुमारे ६१९ टन बायोमेडिकल वेस्टची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी बायोमेडिकल वेस्ट इन्सिनरेटर हे यंत्र वापरण्यात येते मात्र, या यंत्रावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. पर्यावरणाला अपाय, पुनर्वापराची संधी उपलब्ध नसणे, आकाराने मोठे असणे आदी याच्या समस्या आहे. पुष्यमित्रने त्याच्या संशोधनातून बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरण पूरक व पुनर्वापराला चालना देणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे.
यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट (चुना) मध्ये केले जाते तर धातूरुपातील बायोमेडिकल कचरा द्रवरुपात पुनर्वापरासाठी उपलब्ध केला जातो. त्याच्या या संशोधनाला अनेक ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. कोरोना काळात मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी पुष्यमित्र ने १० वापरून झालेले मास्क घेऊन १ सॅनिटायझर भेट देण्याचा अभिनव उपक्रम देखील सुरू केला होता. ज्याद्वारे वापरून झालेल्या मास्कची आपल्या संशोधित यंत्रात त्याने विल्हेवाट लावली. सध्या ५०-१०० किलो प्रति तास बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट करण्याची क्षमता असणारे हे यंत्र गरजेनुसार विविध क्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात येईल.
३ ते ५ जानेवारी या काळात फगवाडा पंजाब येथील लवली प्रोफेशनल विद्यापीठ येथे आयोजित इंडीयन सायन्स काँग्रेस मध्ये देशविदेशातील ख्यातनाम वैज्ञानिकांसमवेत समाजोपयोगी संशोधनाबद्दल वयाच्या २५ व्या वर्षी पुष्यमित्र वैचारिक देवाणघेवाण करणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा