युवा महोत्सवात शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९ व्या युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने पटकाविले. त्याचबरोबर गोल्डन बॉय व गोल्डन गर्लचा किताबही त्याच महाविद्यालयाने पटकावत यंदाच्या युवा महोत्सवात अकलूजचे मोहिते महाविद्यालय ११४ गुण मिळवत द बॉस ठरले. बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने ७४ गुण मिळवत दुसरा तर सोलापूरच्या दयानंद कला महाविद्यालयाने ६१ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.
१० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत पंढरपूरच्या स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे मोठ्या उत्साहात युवा महोत्सव झाला. शुक्रवारी (दि. १३) त्याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री सोनाली पाटील, आ. समाधान आवताडे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी 'स्वेरी'चे सचिव डॉ. बी. पी. रोंगे. योगिनी घारे. प्रा. देवानंद चिलवंत, दादासाहेब रोंगे, अजिंक्यराणा पाटील, 'स्वेरी'चे विश्वस्त सूरज रोंगे, चंदाताई तिवाडी यांची उपस्थिती होती.
ती कला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारी - कुलगुरू डॉ. महानवर
कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, की विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तरुण कलाकारांनी या रंगमंचावर जी कला सादर केली आहे. ती कला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारी आहे. ही स्पर्धा कोणत्याही रिॲलिटी शोपेक्षा कमी नव्हती. त्यामुळे यातील बहुतांश कलाकारांना रिॲलिटी शोमध्ये जाण्याचे भाग्य लाभो, असे ते म्हणाले.
शिक्षणाबरोबर आवडत्या क्षेत्रात लक्ष द्या - सिनेअभिनेत्री सोनाली पाटील
सिनेअभिनेत्री सोनाली पाटील म्हणाल्या, की विद्यार्थ्यांनो शिक्षण घ्या, त्याचबरोबर तुमच्या अंगातील दडलेल्या सुप्त कलागुणांना बाहेर काढा. शिक्षणाबरोबर आवडत्या क्षेत्रात लक्ष द्या. कलाही घडवू शकते, जगवू शकते. म्हणून प्रत्येकाने कलेला जपले पाहिजे. कलेला मरू देऊ नका. शिक्षण म्हणून तुमचा पर्याय एक तुम्ही निवडला असेल तर पर्यायी दोन म्हणून कलेचा वापर करा, असे त्या म्हणाल्या.
अभ्यासाबरोबर तंदुरुस्त राहा - आ. समाधान आवताडे
आ. समाधान आवताडे म्हणाले, की युवा महोत्सवातील व्यासपीठ हे युवकांचे आहे. आपल्या अंगी असलेली कलाच आपणाला मोठे बनवते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. मी देखील कॉलेजला असताना युवा महोत्सवात भाग घ्यायचो. मी कुस्तीमध्ये चॅम्पीयन होतो. मी इंजिनिअर झालो. व्यवस्थापनात आलो. मात्र हे करत असताना कष्ट खूप केले. कष्ट करायला कचरू नका. अभ्यासाबरोबर शारीरिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त राहा. तरच अभ्यास चांगला होतो, असा सल्ला आ. समाधान आवताडे यांनी दिला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा