सरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे संजय साठे तर उपसरपंच पदी भाजपचे महादेव पवार यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे संजय देविदास साठे यांची तर उपसरपंच पदी भाजपा प्रणित परिचारक गटाचे महादेव विठ्ठल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या इतिहासात सरपंच उपसरपंचांची बिनविरोध निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी टाकळी गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजपा नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे रामदास ढोणे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या नेतृत्वात वेगवेगळे पॅनल करुन एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात भाजप परिचारक गटाचे सात व शिवसेना महेश साठे यांचे पाच सदस्य निवडून आले होते. निवडणुकीनंतर राज्यातील युती प्रमाणे टाकळी ग्रामपंचायतीत देखील शिवसेना भाजप युती झाली आणि सत्तांतरानंतर शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत मिळाली.
सत्ता स्थापनेनंतर ग्रामपंचायत मध्ये पहिले वर्ष भाजपच्या परिचारक गटाचा सरपंच आणि शिवसेनेच्या साठे गटाचा उपसरपंच व त्यानंतर शिवसेनेचा सरपंच आणि भाजपचा उपसरपंच असा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार विजयमाला सचिन वाळके यांची सरपंच पदी निवड झाली होती, आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युतीच्या ठरलेल्या फॉर्मुलानुसार आपला शब्द पाळला असून राजीनामा दिला. शुक्रवार दिनांक 20 रोजी सरपंच उपसरपंच पदासाठी निवड होणार होती त्यामध्ये संजय देविदास साठे आणि महादेव विठ्ठल पवार यांनी अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज भरले होते. दोन्ही पदासाठी एक एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची सरपंच उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. विशेष म्हणजे लक्ष्मी टाकळी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच उपसरपंच यांची निवड बिनविरोध झाली आहे त्यामुळे गावात एकच जल्लोष करण्यात आला.
या गावात निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेले परिचारक गट आणि महेश साठे गट सत्तेत एकत्र बसले असले तरी युती करताना ठरलेल्या फॉर्मुलानुसार एक वर्षानंतर परिचारक गटाचे सरपंच राजीनामा देतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती आणि ही युती टिकेल का याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते मात्र युतीत सहभागी असलेले प्रशांत परिचारक आणि महेश साठे या दोन्ही गटाच्या नेत्यांनी अतिशय संयमी भुमिका घेतली आणि राजकीय प्रगल्भता दाखवून आपल्या सरपंचांना राजीनामा देण्याच्या सूचना करून युतीधर्माचे पालन केले. माजी आमदार भाजप नेते प्रशांत परिचारक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, रामदास ढोणे, या सर्वांनी गावाच्या विकासासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन सरपंच उपसरपंच निवड बिनविरोध केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, भाजपा नेते माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे आणि शिवसेनेचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरपंच आणि उपसरपंचांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करुन सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. टाकळी गावच्या ग्रामस्थांनी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. मी आता जाऊ देणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत टाकळी गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन असे नवनिर्माची सरपंच संजय साठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा