प्राचार्य ह.स. खंडगावकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
जगामध्ये भारताला समृद्ध बनवायचे असेल तर विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगले पाहीजे जेणेकरून भारतात पसरलेली अंधश्रद्धा नष्ट होऊ शकेल असे प्रतिपादन माजी प्राचार्य ह. स. खंडगावकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती नायगावच्या वतीने जनता ज्युनियर कॉलेज नायगाव बा. येथे आयोजित कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदावरून केले आहे.
यावेळी अंनिस नायगाव शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांनी भारतातील सण, उत्सवाच्या अनुषंगाने पसरविण्यात आलेल्या वाईट चालीरिती, अंधश्रद्धा यासंबंधी मार्गदर्शन केले.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती ही देव, धर्म, श्रध्दा पुजाअर्चा, भक्ती, विश्वास याच्याविरोधी नसून देव व धर्मासंबंधी कांही स्वार्थी लोकांनी पसरविलेल्या अंधश्रध्देविरुद्ध कार्य करीत असते. पाऊस पडावे म्हणून धोंडी धोंडी पाणी दे, होमहवन, बेडकाचे लग्न, देवाला नवस करणे, वटपौर्णिमेला वडाची पुजा, वडाच्या झाडाची लागवड करण्याऐवजी दोरा गुंडाळणे, नागपंचमीला वारूळात दुध टाकणे, देवाच्या मुर्तीला दुधाने,तेलाने अंघोळ घालून ते वाया घालने, गणपती व दुर्गा विसर्जनाच्या वेळी खोल पाण्यात जाऊन जीव गमावणे त्या ऐवजी हौदामध्ये विसर्जन करने, दुर्गा उत्सवामध्येच अनवाणी पायाने चालने, दिवाळीमध्ये फटाके फोडण्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यातून विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी कशी जोपासावी यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
अंनिसचे महासचिव भा. ग. मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन केले. प्रा. उतम पाटील यांनीही अंनिसची भूमिका मांडली तसेच हे कार्य करणाऱ्यास नेहमीच समाजाचा रोष घ्यावा लागतो पण भविष्यात समाजामध्ये वैज्ञानिक बदल होतात असे ते म्हणाले. उपप्राचार्य प्रभाकर पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपले मनोगत मांडले. यावेळी प्रा. सोमावार, प्रा. देवडे, प्रा.सौ. शिंदे मॅडम, प्रा.सौ. राजश्री कदम मॅडम, प्रा.सौ.मोरे मॅडम यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोठी संख्या होती. अंनिसचे सक्रीय सदस्य सा.रा. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा