भीमा कारखान्याकडून दहीहंडी पूर्वी ऊस बिल अदा - चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिलेला शब्द पाळला
शिवशाही वृत्तसेवा, मोहोळ प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या सर्व ऊसाचे प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी डी.सी.सी बँकेच्या संबंधित शाखांमध्ये २०२२-२३ च्या हंगामात गाळपास आलेल्या सभासद, बिगर सभासद व गेटकेन यांचे ऊसाचे बिल प्रति मे. टन २२०० प्रमाणे जमा करण्यात आले. रोलर पूजन कार्यक्रमावेळी दहीहंडी पूर्वीच ऊसाची बिले देऊ असा दिलेला शब्द चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पाळल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
"महाराष्ट्र शासनाचे हमीवर कारखान्यास एन.सी. डी.सी. नवी दिल्ली यांचे मार्फत कर्ज उपलब्ध झाले, त्यातूनच आपण शेतकऱ्यांची बिले अदा करत आहोत" असा दुजोरा चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिला. या प्रक्रियेत एन.सी.डी.सी चे अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक व डी.सी.सी बँक प्रशासक यांचे देखील आभार मानले. विशेषतः भीमा परिवाराचे मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी एन सी डी सी प्रकरण कामी अथक परिश्रम करून सभासदांना न्याय दिला याबद्दल यांचेही आभार मानले.
भीमा कारखाना मागील काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडचणींमधून जात असताना सुद्धा सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात ऊस देऊन सहकार्य केले याबद्दल चेअरमन विश्वराज महाडिक यांनी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा आभारी असल्याचं मत व्यक्त केलं. भीमा कारखाना कार्यस्थळावर इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची पूर्तता करणे सुरु असून लवकरच भूमिपूजन केले जाईल अशी माहिती देखील चेअरमन विश्वराज यांनी यावेळी दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा