मान्यवरांनी केले स्वेरीच्या वाटचालीचे तोंड भरून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर जवळ असलेल्या आणि संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोपाळपूर येथील मार्गावर ज्ञानाचे मळे फुलवणाऱ्या स्वेरी कॉलेजचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे. स्वेरी कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ दिनांक 16 ऑगस्ट रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांची उपस्थिती होती.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे डॉक्टर एन बी पासलकर, विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौभाग्यवती प्रेमलता रोंगे, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, शास्त्रज्ञ व्ही. के. सूरी, बाटुचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ, गव्हार्निंग बॉडीतील डॉ. विजय कुलकर्णी, माजी विद्यार्थी संघटनेचे दत्ता घोडके, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनिफ शेख, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी. बी. नाडगौडा, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्राध्यापक सूरज रोंगे, डॉ. विश्वासराव मोरे व अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रजनीश कामत आणि प्रमुख पाहुणे आमदार रामभाऊ सातपुते यांनी संदेश फलकावर विद्यार्थ्यांसाठी आपले संदेश लिहिले. प्राध्यापक संतोष मडकी यांनी लिहिलेल्या, राजू पुरंदरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि योगेश गायकवाड यांनी गायलेल्या स्वेरी गीताचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर बीपी रोंगे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा प्रवास उलगडून दाखवला. "गोपाळपूरच्या माळरानावर छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सुरू झालेले हे कॉलेज आज 27 एकराच्या भव्य कॅम्पसमध्ये दिमाखात उभे आहे मात्र ही संस्था उभी करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. परंतु असंख्य ज्ञात अज्ञात मदतीचे हात पुढे आले आणि ही संस्था उभी राहिली आणि आज रौप्य महोत्सव साजरा करताना संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेने नावलौकिक मिळवला" असे रोंगे सरांनी सांगितले.
या कॉलेजचा लौकिक सर्वश्रुत आहे, इथे ज्ञानदाना बरोबरच इथे शिस्त आणि जीवनमूल्य देखील शिकवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनी माझा देश माझे करिअर हा विचार घेऊन पुढे चालावे असा संदेश आमदार राम सातपुते यांनी आपल्या मनोगत दिला तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर रजनीश कामत म्हणाले की "स्वेरी कॉलेजमध्ये तंत्रज्ञानाचा समाजासाठी उपयोग कसा करावा याबाबत उपक्रम घेतले जातात." "कॉलेजने आजपर्यंत अनेक ध्येय साध्य केले आहेत. यापुढे देखील वेगवेगळ्या तंत्रज्ञान क्षेत्रात इथे संशोधन होऊ शकते" असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी कॉलेजला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या समारोप समारंभाचे मुद्देसूद आणि सुंदर सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी उपस्थित आमचे आभार मानले. कार्यक्रमाला मंचावरील मान्यवरांसह पंढरपूर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा