दिनांक 19 ऑगस्ट रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा सन 2022-23 चा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरु पंडित रामदास (नाना) रोंगे यांना जाहीर झाला आहे.
पंडित रामदास नाना रोंगे हे खर्डी येथील रहिवासी असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी बालवयातच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. अफाट मेहनत, जिद्द, आणि नियमित रियाज करून त्यांनी संगीत क्षेत्रातील एक एक पायरी सर केली आहे. त्याचबरोबर पंडित रामदास रोंगे यांनी संगीत शिक्षक म्हणूनही अनेक शिष्य घडवले असून आज संगीत क्षेत्रात त्यांचे शिष्य चमकदार कामगिरी करत आहेत. पंडित रामदास नाना रोंगे हे गेली 40 वर्षे संगीताचा प्रचार आणि प्रसार करत असून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत आहेत.
त्यांच्या या एकूण कारकीर्दीचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचा 2022-23 चा पंडित विष्णू पलूसकर कला गौरव पुरस्कार रामदास रोंगे यांना जाहीर झाला असून दिनांक १९ ऑगस्ट २०२३ नवी मुंबई येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावर्षी पंडित पलूसकर यांची 150 वी जयंती असल्यामुळे एकूण 150 संगीत सेवकांचा यावेळी सन्मान होणार आहे. पंडित पलुस्कर हा संगीत क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार ग्रामीण भागातील संगीत सेवकाला मिळाल्याने रामदास नानांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा