आम आदमी पार्टीचा पंढरपूरमध्ये मूक मोर्चा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
दिल्ली सरकारने सुप्रीम न्यायालयात आठ वर्षे लढा दिला. कायदा आणि सुव्यवस्था तसेच येथील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडे देण्याचा निर्णय सुप्रीम न्यायालयाने दिला. आठ वर्षे दिलेल्या या लढ्याचे होते नव्हते करण्याचे काम केंद्र सरकारने अध्यादेश काढून केले. आता त्याचा कायदाही करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. केंद्र सरकारच्या या संविधानविरोधी भूमिकेचा पंढरपूरमध्ये धिक्कार करण्यात आला. आम आदमी पार्टीने पंढरपूरमध्ये आंदोलन करून, केंद्र सरकारची ही संविधानविरोधी भूमिका उघड केली.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील तसेच युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरमध्ये आम आदमी पार्टीने मूक मोर्चा काढला.
येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत या मूक मोर्चाने मार्गक्रमण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर किरण घोडके यांनी आम आदमी पार्टीची भूमिका मांडली. केंद्र सरकारच्या देशविरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला. आम आदमी पार्टीने ही चळवळ देशभर राबवली आहे, दिल्ली येथील केजरीवाल सरकारविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या या भूमिकेस तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक पक्षप्रमुखांनी केंद्र राज्यसभेत विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. आम आदमी पार्टी केंद्र सरकारची ही मनमानी कदापिही खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा युवा अध्यक्ष किरण घोडके आणि जिल्हाध्यक्ष एम. पाटील यांनी दिली.
याप्रसंगी आम आदमी पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अरविंद येलपले, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, बार्शी तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, पंढरपूर तालुका आम आदमी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी गांडुळे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष भारत शिंदे, माढा तालुका उपाध्यक्ष सतीश लोंढे, मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष एकनाथ फाटे, व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष बंडू मोरे, पंढरपूर तालुका समन्वयक श्रीरंग बागल, सत्यवान शेळके, बार्शीचे मशुद्दीन मुलानी, महादेव खांडेकर, बाबर डी.एम., मोरे एफ.डी. आदींसह आम आदमी पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने अध्यादेश काढून सुप्रीम न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेल्या अधिकारांवर गदा आणली आहे. कायदा सुव्यवस्था आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार सुप्रीम न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले होते. यावर अध्यादेश काढून केंद्र सरकारने हे अधिकार त्यांच्याकडे घेतले आहेत. सुप्रीम न्यायालयाचा हा अवमान असून, देशातील विरोधी नेत्यांनी यास कडाडून विरोध केला आहे. राज्यसभेत केंद्र सरकारच्या या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी पंढरपूरमध्ये आम आदमी पार्टीकडून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे प्रतिनिधित्व जिल्हाध्यक्ष एम. पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण घोडके यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा