महाराष्ट्र क्रीडा असोशिएशनचे फिटनेस कोच तेजस मातापुरकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
अलीकडच्या काळात सगळीकडे उत्तम दर्जाच्या मैदानांची कमतरता भासत आहे. शाळा-महाविद्यालये मोठ्या संख्येने आहेत पण विविध क्रीडाप्रकारांसाठी मैदाने नाहीत आणि मैदाने असली तरी ती सुस्थितीत नाहीत. आज स्वेरीचे भव्य क्रीडांगण पाहून मनस्वी आनंद झाला. फार कमी शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वेरीसारखी क्रिकेटची सुसज्ज आणि हिरवीगार मैदाने दिसून येतात. भर उन्हाळ्यात देखील येथील मैदान हिरवेगार दिसत असून त्याची देखभालही उत्तम होत असल्याचे जाणवते. खेळाडू घडण्यासाठी मैदानाची गरज असते. भविष्यात स्वेरीच्या मैदानावरून नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील. भविष्यात या क्रीडा मैदानासाठी माझी काहीही मदत लागली तर ती नक्की करू. स्वेरीच्या ग्राउंडवर भविष्यात मोठमोठ्या स्पर्धा खेळवल्या जावू शकतात. आत्ताच स्वेरीचे मैदान हे मोठ्या स्पर्धांना खुणावत आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनचे व चेन्नई सुपर किंग्ज टीम मधील उस्मानाबादचे खेळाडू राजवर्धन हंगरगेकर यांचे कोच व बीसीसीआय फिटनेस ट्रेनर तेजस मातापुरकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सुसज्ज असलेल्या क्रीडा मैदानाला महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनचे फिटनेस कोच तेजस मातापुरकर व महाराष्ट्र वुमन्स क्रिकेटर्स असोसिएशनच्या फिटनेस कोच मासुमा मातापूरकर यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी कोच तेजस मातापुरकर हे स्वेरीचे क्रीडांगण पाहून गौरवोद्वार काढत होते. प्रारंभी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी स्वेरीच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीमध्ये आलेले यश सांगताना स्वेरीची चारही महाविद्यालये, यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी संख्या, शैक्षणिक, विधायक व सामाजिक कामगिरी, स्वेरीला मिळालेली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकने, प्लेसमेंटच्या माध्यमातून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षवेधी संख्या, संशोधने व यासाठी मिळालेला निधी यांसह स्वेरीची संपूर्ण माहिती दिली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज स्वेरीचे मैदान अधिक आकर्षक बनले असून सर्वत्र हिरवळ पसरली आहे. या क्रीडांगणाची स्वतंत्र देखभालही केली जात आहे. गोलाकार स्वरूपात हे मैदान असून सध्या ते क्रिकेटच्या मोठमोठ्या मैदानाप्रमाणे दिसत आहे. मैदानाच्या चारही बाजूला फ्लड लाईट्सचे उंच खांब बसविले असून याद्वारे नाईट मॅचेसची देखील सोय केली आहे. या मैदानावर भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ होऊ शकतात. या मैदानाची पाहणी करताच 'डॉ.रोंगे सरांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची चुणूक दिसते' असे त्यांनी उदगार काढले आणि या क्रीडांगणाचे विशेष कौतुकही केले. यावेळी त्यांच्या समवेत छत्रपती क्रिकेट अॅकडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सचिन तांबिले, रवी निंबाळकर, अथर्व पाटील, अपूर्व पाटील आदी उपस्थित होते तसेच स्वेरीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदी देखील उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा