नुसते 'शिक्षितच' नव्हेतर "सुशिक्षित" व्हा..!
प्रवीण गीते लिखित काळीजकोंडी लेखमालेचा ४० वा भाग खास शिवशाहीच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवीण गीते सर आणि शिवशाही न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे यांचे आभार
जुन्या काळात शिक्षणाची हवी तेवढी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळेच फार कमी लोक शिक्षणाच्या प्रवाहात येत असत.म्हणजे ज्यांना वरच्या वर्गात शिकायचं आहे,त्यासाठी त्यांना फार दूरवर जावं लागत असे. प्राथमिक शिक्षण सोडलं तर गाव खेड्याच्या परिसरात,त्यापेक्षा उच्च शिक्षण मिळायचं नाही. तेंव्हा सातवी पास म्हणजे आजच्या तुलनेत खूप मोठे शिक्षण होते.परंतु त्याकाळी जे शिक्षण होतं, ते खूप प्रभावी, त्याचबरोबर व्यावहारिक आणि सामाजिक अर्थानं मूल्य रुजविणारं शिक्षण असं म्हटलं तरी वावगं ठरु नये.आजमितीस आमच्या अवतीभवती शिक्षणाची सोय खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. अगदी गाव खेड्यालगत सुद्धा उच्च शिक्षणाची कॉलेजेस आली आहेत. त्यातून मुलंमुली शिकून, उच्चशिक्षित होऊ लागली आहेत.मागील कालखंडापेक्षा सांप्रत काळात शिक्षणाचं प्रमाण खूप वेगाने वाढत गेलं आहे. त्यामुळे आज जिकडे तिकडे शैक्षणिक विषयांचाच पगडा आम्हाला दिसून येतो आहे.
आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पालक हजारो किलोमीटरचा प्रवास पार करून पाल्याच्या शिक्षणाची सोय करीत आहेत.हे सगळं चित्र पाहात, जरा वेगळ्या अंगाने विचार करावासा वाटतोय.आजची पिढी खूप शिकते आहे.परंतु, जुन्या काळात शिकवला गेलेला व्यवहार,आमची या कालखंडातील पिढी, मात्र शिकू शकली नाही. त्या काळातील सामाजिक संस्कारांची मूल्ये आजच्या शिक्षण व्यवस्थेतून नव्या पिढीतून पाहिजे त्या प्रमाणात आढळून येत नाही. बारावी झालेल्या एखाद्या मुलाला बँकेच्या व्यवहाराबाबतीत कसलंही नॉलेज नसतं. त्याला साधा विड्रॉल सुद्धा भरता येत नाही. कॅलक्युलेटरवर लाखोंची गणिते करणारा, प्रत्यक्षात मात्र व्यवहार दक्ष राहून शंभर रुपयाचा बाजार व्यवस्थित करू शकत नाही,हे आजचं दुर्दैव आहे.
महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं प्रमाण शिक्षित झालेल्या पिढीत वाढत आहे. परंतु, ज्या पद्धतीने त्याचे आयोजन केल्या जाते, त्यातला मिरवणुकीचा प्रकार हा तर आपल्या सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे. त्या मिरवणुकीतून महापुरुषांचे विचार किती प्रमाणात रुजतात? हा तर मुख्य प्रश्न आहे.म्हणजे मूळ विषय बाजूलाच राहतो आणि आमच्या विचारांचा प्रवास धांगडधिंगा अन त्यातून भलतीकडेच सुरू होतो. दुर्दैवाने ही सगळी कामे प्रामुख्याने शिकलेली माणसं करीत आहेत. अडाणी माणसाच्या डोक्यात आणि मनात निदान माणूसपण आढळतं,परंतु शिकलेल्या माणसाच्या डोक्यात जात,धर्म,पंथ आदि बाबी प्रभावी असतात,असंच म्हणावं लागेल. शिष्टाचाराचा प्रघात संपत चालला की काय?असंच आता वाटायला लागलं आहे.आपण जास्त शिकलेलो आहोत,हा अभिमान अहंकारात परीवर्तित झाल्याने, शिकलेली माणसं इतरांना हवा तसा मानसन्मान देईनाशी झाली आहेत. खरंतर शिकलेली बहुतांश माणसं जात,धर्म,पंथ आदि विषयात स्वतःला अडकवून घेत आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजातील सर्वच घटकांना वळण लावण्याचे काम केलं पाहिजे,अशी माफक अपेक्षा त्याच्याकडून असते.मात्र दुर्दैवानं तसं काही होताना दिसून येत नाही.समाजात शिकलेला माणूस हा चिडखोर व भांडखोर होत चालला आहे,हे वास्तव सुद्धा आम्हाला स्वीकारावे लागेल.शिक्षणामुळे अभ्यास वाढला,कायदा कळू लागला पण घराघरातील बंधुत्व मात्र त्याला समजेनास झालं. त्याचा परिणाम साहजिकच समाजमनावर होत,नात्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.एका विषयात शिक्षण झाले म्हणजे त्याचा वापर त्याच फिल्ड मध्ये होतो असं काही नाही. उदाहरणार्थ:- एखादा तरुण वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाला.आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून तो रुग्णांना बरे करतो. पण त्यापलीकडे जात, सामाजिक स्वास्थ बिघडू नये याची सुद्धा काळजी रुग्णाप्रमाणेच घेण्याची गरज व जबाबदारी सुद्धा डॉक्टरचीच आहे.हे उदाहरण वानगी दाखल दिलं आहे.असं प्रत्येक बाबतीत (शिक्षक, वकील, अधिकारी, व्यापारी, इंजिनीयर आदि) अंतर्मुख होऊन आपण याचा विचार केला तर हे सगळं प्रमाण मागेपुढे असेच दिसून येईल. पूर्वीच्या काळी माणसे कमी शिकलेली असायची.पण त्यांच्या विचारांची उंची प्रचंड असायची.आज शिक्षण अधिक उंचीचे करतात, परंतु विचार मात्र छोटा किंवा कोता करतात. हे जळजळीत सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल.
प्रत्येक क्षेत्रातलं हे चित्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.कळतं पण वळत नाही अशी अवस्था प्रत्येकाचीच झाली आहे. आम्ही अंतर्मुख होत या मागचं सत्यशोधन केले पाहिजे.देश म्हणून त्यासाठी काही उत्तरदायित्व निभवायचं असेल तर आम्ही किती शिकलो,आम्ही किती 'शिक्षित' झालो?याला काही अर्थ नाही.जोपर्यंत आम्ही 'सु-शिक्षित' होणार नाही तोपर्यंत आमच्या अस्तित्वालाच काही अर्थ उरणार नाही. एवढे मात्र खरे ..!
प्रवीण गीते (सामाजिक कार्यकर्ते)
लोकजागर परिवार
९८२३९४२९७३
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा