नेवासा तालुक्यातील ऱ्हदयद्रावक घटना
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने पाणी घेवून जाण्यासाठी आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील पाच जण गोदावरी नदीमध्ये बुडाल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवार (दि. ११) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती.
गोदावरी नदीपात्रात पाच जण बुडालेले असतांना एक जण सुदैवाने नदीपात्रातून स्थानिक नागरीकांच्या व प्रशासनाच्या मदतीने पोहून बाहेर आलेला आहे. तर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात सायंकाळी प्रशासनाला यश आले असून अन्य दोघा जणांचा युद्ध पातळीवर स्थानिक नागरीकांच्या व प्रशासनाच्या मदतीने शोध सुरु केला होता. रात्री उशिरा सर्व मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांसह पोलीस कर्मचारी, आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरु केले होते. जवळपास आठ ते दहा तासांच्या अथक परिश्रमाने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले आहे. मात्र या घटनेनंतर नेवासा परिसरात शोककळा पसरली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा