भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांचा संकल्प
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( प्रतिक सोनपसारे )
शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला व्यायामाची गरज आहे. मात्र, बहुतांश स्पर्धेच्या युगामध्ये नागरिक, महिला, युवक, युवती व्यायामापासून दूर जात आहेत. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वांच्याच आरोग्याच्या समस्या सुटाव्यात, युवा वर्गातून नवीन खेळाडू जिल्ह्यात निर्माण व्हावे, त्यांना क्रीडा क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने गावोगावी व्यायामशाळा योजना आखली आहे.
गाव तिथे व्यायामशाळा आणि वाचनालयाची चळवळ भाजपच्या वतीने राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान मागणी करा, व्यायाम शाळा मिळेल असा अनोखा प्रयोग मातृतीर्थ जिल्ह्यातून राज्यभरात राबवला जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या स्तुत्य उपक्रमासंदर्भात बोलताना विनोद वाघ म्हणाले, शहरी तसेच ग्रामीण परिसरामध्ये नागरिक व्यायामापासून दूर जात आहेत. काही खेळाडूंना आवड असतानाही त्यांना क्रीडा साहित्यउपलब्ध नसते.
अशावेळी त्यांना क्रीडा क्षेत्रापासून दूर राहावे लागते. मात्र, आता शहरी भागासह ग्रामीण परिसरातील खेळाडूही क्रीडाक्षेत्रात मागे राहणार नाही. अनेक गावात फक्त कागदोपत्री व्यायाम शाळा आहे, त्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो शासनाने ठरवावा. मात्र प्रत्यक्षात गाव तिथे व्यायामशाळा व गाव तिथे वाचनालय असलेच पाहिजे, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. युवक, युवतींना नोकरीसाठी व सर्व वयाच्या लोकांना स्वतःचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व भारताचे उद्याचे भविष्य सशक्तकरण्याकरिता हा लढा उभारणे गरजेचे आहे. गाव, शहर, वाडा, वस्ती, तांडा प्रत्येक ठिकाणी व्यायाम शाळा व वाचनालय होणे काळाची गरज आहे.
आमच्यासोबत या लढ्यात ज्यांना सहभागी व्हायचे ते होऊ शकता. खरंतर सर्व भेदभाव बाजूला ठेऊन प्रत्येक सुजान नागरिकांनी या लढ्यात उतरले पाहिजे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून करणार असून, गाव तिथे व्यायामशाळा व वाचलनालय निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विनोद वाघ यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा