सदस्यांची संख्या सुधारण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार मुंबई महापालिकेत दहा नामनिर्देशित सदस्य नियुक्त करता येणार असून, मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा १० सदस्य यापैकी जे कमी असेल, अशा प्रमाणात नियुक्ती करता येणार आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम 5(१) (ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५(२) (ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकांमधील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा