राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना दिलासा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील अनेक दुकानं व घरे पाडून राबविण्यात येणारा अन्यायकारक कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथील विविध पक्षातील पदाधिकार्यांनी व संत भूमी बचाव समितीने कोल्हापूरला भेट घेतली असता त्यांनी तुम्ही आंदोलन चालू ठेवा,आपण याबाबत सरकार दरबारी प्रयत्न करून यातून निश्चित मार्ग काढू, असे आश्वासित केल्याने येथे आराखड्यात बाधित होणार्या हजारो लोकांना दिलासा मिळाला आहे.
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे पंढरपूर शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी कार्यकर्ते महाराज मंडळी मंदिर परिसरातील नागरिक आणि संत भूमी बचाव समिती व संघर्ष समिती यांचे पदाधिकारी या सर्वांनी भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी ठाकरे यांनी या पदाधिकार्यांचे सारे गार्हाणे ऐकून घेतले तसेच जी भूमिका त्यांनी घेतली आहे. ती योग्य असून आपण कोणालाही बेघर अथवा त्यांचा बेरोजगार होवू देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून निश्चितपणे यामधून मार्ग शोधू व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे सर्व पंढरपूरकरांच्या पाठीशी कायम राहिल, असा दिलासा शिष्टमंडळाला दिला.
दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीच्यावेळी पंढरपूरच्या सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी या आराखड्याची व प्रस्तावित कॅरिडॉर तसेच पर्याय याची माहिती दिली.
यानंतर बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले, अन्यायकारक कॅरिडॉर रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही अनेक दिवस लढा देत आहोत. तरीही सरकार व प्रशासन ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. लोकांना बेघर व बरोजगार करून विकास साधणे शक्य नाही. हा आराखडा मुंबईत तयार केला जातो, याच्या बैठका अनेकदा सोलापूरला होत आहेत. यामुळे यात पारदर्शकता नाही, असे आमचे ठाम मतं आहे. पंढरपूरचा विकास करायचा आहे तर आराखडे येथेच तयार करा व जनतेला याची खरी माहिती द्यावी, अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. यासाठीच आम्ही राजसाहेब ठाकरे यांची कोल्हापूरमध्ये भेट घेवून त्यांना याची माहिती दिली. मनसे ठामपणे या आंदोलकांच्या पाठीशी असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाने पंढरपूरकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांच्या भेटीनंतर सर्वच पदाधिकारी तसेच संतभूमी बचाव समिती सदस्य आनंदीत झाले आहेत.
समितीचे प्रमुख आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, आम्ही अन्यायकारक व अनेक घर व दुकान बाधित करणार्या कॅरिडॉरला विरोध करत आहोत. गेले अनेक दिवस विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहेत. मात्र तरीही प्रशासन आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे पाहता आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांना सर्व स्थिती समजावून सांगितली असता त्यांनी यात लक्ष घालून पंढरपूरकरांना नक्की या अन्यायकारक आराखड्यातून दिलासा देवू , असे आश्वासित केल्याने आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आहे. ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढतील.
यावेळी रामकृष्ण वीर महाराज , अॅड, राजेश भादुल, ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे ,श्रीकांत शिंदे, महंमद उस्ताद, अभय इचगांवकर , अॅड. कीर्तीपाल सर्वगोड ,साईनाथ बडवे, सुमित शिंदे , महेश खिस्ते ,शिरीष पारसवार, बबन बिडवे ,अमृत ताठे देशमुख, व्यंकटेश कुलकर्णी ,गणेश पिंपळनेरकर ,श्रीनिवास उपळकर ,भैय्या जोशी ,गणेश लंके ,बाबाराव बडवे महाजन, दादा भिंगे उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा