तुळजापूर सोलापूर रोडवरील भीषण अपघातात सोलापूरचे दोन तरुण ठार
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर-तुळजापूर : रोडवरील तळे हिप्परगा येथे मेजरसाब हॉटेलच्या समोर दुचाकी आणि टिपरच्या झालेल्या भीषण अपघातात सोलापूरचे दोन तरुण ठार झाले आहेत. रविवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन्ही तरुण हे तुळजापूरहून आई तुळजाभवानीचे दर्शन करून तुळजापूर आहे सोलापूरकडे येत होते. रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय २२) व व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती (वय २४, दोघे रा. नवीन विडी घरकूल, कुंभारी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती नुसार, मयत दोन तरुण (एमएच १३ डीएच ००७४) या दुचाकीवरून तुळजापूर येथून सोलापूरच्या दिशेने येत होते. टिपरही (एमएच १३ डीक्यू ४०१०) सोलापूरच्याच दिशेने येत होता. दरम्यान पाठिमागे असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या भरधाव टिपरने जोराची धडक दिली. यात दोघे तरुण जागीच ठार झाले. मालवाहू वाहन अतिशय वेगात असल्याचे परिसरातील प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आले.
नवरात्र काळात देवीचे दर्शन घ्यावे म्हणून मयत रवींद्र नागनाथ अलशेट्टी, आणि व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती यांच्यासह आठजण चार दुचाकीवर तुळजापूरला गेले होते. दर्शन आटोपून परत येताना तळे हिप्परगा जवळील मेजरसाब धाब्याजवळ पाठिमागून येणाऱ्या टिपरने धडक दिली. देवीचा आशीर्वाद घेऊन घरी परतण्यापूर्वीच या दोघांवर काळानं घाला घातला. या घटनेमुळे नवीन विडी घरकूल परिसरात शोककळा पसरली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा