सभासदांनी सर्व विषयांना एकमताने दिली मंजूरी
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सोमवार दिनांक २६.०९.२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, श्री अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यासभेत सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजूरी दिली. सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक-व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर सभेमध्ये कारखान्याचे संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी श्रध्दाजंलीचा ठराव मांडला. प्रास्ताविकात बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी मागील गाळप हंगाम सन २०२१-२२ मध्ये कारखान्याची आर्थिक अडचण व तत्कालीन संचालक मंडळाचे अनियोजनामुळे बंद राहिल्याने खेद व्यक्त केला.
तसेच गळीत हंगाम २०२२-२३ हंगामाकरिता कारखान्याचे कार्यक्षेत्रामधून ३१५३२ एकर ऊसाची नोंद झालेली आहे. या क्षेत्रामधून १२ लाख १५ हजार मे. टन ऊस उपलब्ध होईल. गळीतास येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन रु. २५००/- इतका दर देणेत येणार आहे. तसेच सभासदांना ऊसाचे बेणे उपलब्ध करणेसाठी पुर्वीप्रमाणे व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून मार्गदर्शन घेवून बेणेमळा तयार करणेत येईल व सभासदांना ऊस लागवडीसाठी बेणे पुरविणेत येईल अशी खात्री दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रॉ शुगर व पांढरी साखर यास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केंद्र शासनाकडून ५० ते ७५ लाख मे. टन साखर निर्यात करणेसाठी परवानगी देणेत येणार आहे. परंतु १०० लाख मे. टन साखर निर्यात करणेस केंद्र शासनाकडून मंजूरी मिळावी, अशा आशयाचा ठराव मंजूर करणेत आला.
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत साखरेची मागणी वाढलेमुळे गतवर्षी देशातून उच्चांकी साखर निर्यात झाली. परंतु केंद्र सरकारने देशातंर्गत कोटा पध्दतीचे साखर विक्रीचे धोरण अवलंबून साखरेची एम.एस.पी. रुपये ३१००/ ठरविली आहे. आशा स्थितीत ऊसाची एफ.आर.पी. व उत्पादन खर्चाचा विचार केल्यास हा दर रुपये ३६००/ करणे आवश्यक आहे. त्यामुळे कारखानदारीला दिलासा मिळू शकेल असे सांगितले.
आपले कारखान्याचे डिस्टीलरी प्रकल्पामधून मोलॅसेस पासून फक्त आर. एस. व इ. एन. ए. तयार होते. आपल्या कारखान्यात येणाऱ्या काळात इथेनॉल प्रकल्प यावर्षी सुरु करणे येईल असे सांगितले. कारखान्यामार्फत सभासदांचा अपघात विमा उतरविलेला असून त्याचा संरक्षण कालावधी दि. ३२१.०९.२०२२ पासून सुरू झालेला आहे. याचा सर्व सभासद / कामगारांना लाभ होईल.
शासनाने सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाचे दर्शनी मुल्यांमध्ये १० हजारावरुन १५ हजार बाढ करणेबाबत दि. १८ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार भाग भांडवलामध्ये वाढ करणे संस्थेवर बंधनकारक असल्याने सदरचा निर्णय घेणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले.
आपले कारखान्याचा पेट्रोल पंप मार्च २०२२ पासून बंद होता. परंतु दिनांक ७ जुलै २०२२ रोजी पासून सुरू केलेला असून त्याचा सभासद, कर्मचारी व परिसरातील आम जनतेस डिझेल- पेट्रोल पंप सेवेचा चांगला लाभ होत आहे.
कारखान्याचे यापुर्वीचे ई.आर.पी. सिस्टीम योग्य पध्दतीने चालत नव्हती. त्यामुळे संगणकावर नवीन अद्यावत बॉस ई. आर. पी. प्रणाली घेवून संपूर्ण कामकाज संगणकीकृत व मोबाईल अॅपव्दारे सुरु केले असल्यामुळे दैनंदिन कामे वेळेत व अचुक होतील असे सांगितले.
सन २०२०-२१ गळीत हंगामामधील थकीत ऊस बिलाचे पेमेंटबाबत वेळेत अदा केल्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी सांगितले. तसेच ऊस तोडणी वाहतूकीची बिले लवकरच देणेत येतील व कामगारांची पगाराची देय रक्कम टप्या टप्याने देणार आहोत.
यावेळी समेचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी सभासदांनी विचारलेल्या लेखी धोरणात्मक सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच कारखान्याचे सभासद श्री विलास शिवाजी पाटील, रा. रोपळे यांनी कारखान्याच्या गैरव्यवहाराबाबत लोकआयुक्त यांचेकडे तत्कालिन संचालक मंडळाच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. त्यामुळे त्यांचा सदर सभेमध्ये अभिनंदनाचा ठराव मंजूर करणेत आला.
श्री विठ्ठल प्रशालेचे माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्याकरीता ४०० मिटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार असून शालेय स्पर्धेसाठी त्याचा फायदा होईल व २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही आयोजित
करणेत येणार आहे. आपल्या कारखान्याची ३६७ एकर जमीन असून त्यापैकी १०० एकर जमीन कारखान्यास पुरेशी आहे व इतर जमीन न विकता तेथे कारखान्याच्या माध्यमातून एम.आय.डी.सी.ची निर्मिती करणेत येणार असून त्यामधून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
तसेच कारखाना व कारखाना परिसरात राहणान्या महिलासाठी मिटकॉन कंपनी यांचेबरोबर करार करून श्री विठ्ठल गारमेंटस्ची स्थापना केलेली आहे. त्यामधून महिलांना ३० शिलाई मशिन उपलब्ध करुन दिलेल्या असून त्यामधून महिलांना कापड निर्मितीचा उद्योग उभाकरुन रु.६ ते १८ हजार पर्यंत स्वयंम रोजगार उपलब्ध होईल. भविष्यामध्ये १ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी सांगीतले.
यावेळी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक, श्री डी. आर. गायकवाड यांनी प्रथम सर्वांचे स्वागत करुन विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी व हात उंचावून मंजूरी दिली. सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व उपस्थित सभासदांसाठी जेवणाची व्यवस्था करणेत आली होती.
या सभेसाठी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बब्रुवाहन रोंगेसर, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, सौ. सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्केसर, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, राजाराम सावंत, सुरेश सावंत, एम.एस.सी. बँकेचे प्रतिनिधी सी.एस. पाटील, धाराशिव कारखान्याचे श्री अमर पाटील, सुभाष भोसले, विष्णू बागल, देवानंद गुंड-पाटील, सुरेशदाजी बागल, प्रकाशआप्पा पाटील, बिभिषण पवार, श्रीरंग बागल, ॲड. रामलिंग कोष्टी, ॲड. नागणे, महादेव देठे, हणमंत पवार, शहाजी साळुंखे, कारखान्याचे सभासद, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले व सुत्रसंचलन प्राचार्य नागटिळक सर यांनी केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करणेत आली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा