वैदिक पद्धतीने, ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात बटूंना उपनयन संस्कार व गायत्री मंत्राची दीक्षा
भारतीय सनातन संस्कृतीमध्ये, मानवी जीवनात सोळा संस्कार सांगितले आहेत. या सोळा संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे, उपनयन संस्कार. बाल्यावस्थेतील बटूने, उपनयन संस्कार झाल्यानंतर, यज्ञोपवीत धारण करून, बारा वर्षे ब्रह्मचर्यपालन करायचे असते. त्याचबरोबर गुरूगृही जाऊन ज्ञानार्जन करावयाचे असते. या दरम्यान त्याच्या ज्ञानसाधने मध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या बटूने स्वकीयांपासूनही दूर रहावे, असा दंडक आहे. त्यामुळे ज्ञानोपासनेला महत्त्व देणारा उपनयन संस्कार , हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो. या संस्काराला व्रतबंध, मुंज, मौंजीबंधन, यज्ञोपवीत संस्कार, असेही म्हणतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात या संस्काराचे मूल्य समाजातून कमी होत असल्याचे जाणवते. मात्र पेशवा युवा मंचाने 51 बटुंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करून या संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
पाच मे रोजी पंढरपूर येथे संपन्न झालेल्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्यास महेश परिचारक हे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मनसे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, पिंपरी चिंचवड मनपा उपायुक्त विठ्ठल जोशी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त वेदमूर्ती प्रशांत गायधनी, ज्योतिषाचार्य जगदीश कुलकर्णी, पंढरपूर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, आदी प्रमुख पाहुणे व उद्योगपती सागर बडवे, चेअरमन अतुल उत्पात, सेवाधारी प्रतिनिधी नृसिंह पुजारी, शुक्ल यजुर्वेदी ब्रह्मवृंद संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वांगीकर, पंढरपूर तीर्थक्षेत्र पुरोहित महासंघाचे अध्यक्ष वेदमूर्ती दिलीप जोशी, कण्व परिषद कार्यकारिणी सदस्य नरेंद्र कवडे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, डॉक्टर श्रीराज काणे, गुरुवर्य मंदार परिचारक, रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे सेवेकरी पु.व. कुलकर्णी गुरुजी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात ज्या बटुंचा उपनयन संस्कार संपन्न झाला, त्या प्रत्येक बटूला पळी, पात्र, ताम्हण, तांब्या, सोवळे, उपरणे, तसेच संपूर्ण विधी सामुग्री, पेशवा युवा मंचाच्या वतीने पुरवण्यात आली होती. सोहळ्याला उपस्थित बटूंच्या नातेवाईकांना जेवण देण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात वैदिक पद्धतीने सर्व बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले. बटू पित्याने बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा देऊन संध्याविधि शिकवला. तसेच महिला वर्गाने बटुंना भिक्षावळ घालून आशीर्वाद घेतले.
सायंकाळी सर्व बटूंची घोड्यावरून तसेच बग्गीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वार पासून प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या नेत्रदीपक मिरवणुकीत, बटूंच्या नातेवाईकांनी नृत्य करून व फुगडी खेळून आपल्या बटूंच्या ज्ञानसाधनेचा श्रीगणेशा साजरा केला.
सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे हे अकरावे वर्ष असून, यावर्षी सुध्दा हा व्रतबंध सोहळा अतिशय शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी पेशवा युवा मंच चे सर्व कार्यकर्ते गेले दोन महिने अहोरात्र कष्ट घेत आहेत. सोहळा संपन्न झाल्यानंतर पेशवा युवा मंचाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर कार्य सिद्धीचे समाधान झळाळत होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा