आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला यश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिकतम सक्षम करण्यासाठी व रुग्णांच्या रुग्ण सेवेसाठी पंढरपूर येथे अस्तित्वात असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये रूपांतर करून आवश्यक अर्थिक तरतूद करावी अशी मागणी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची मंत्रालय दालनामध्ये भेट घेऊन सदर मागणी पत्राद्वारे केली होती. आ. समाधान आवताडे यांनी वेळोवेळी केलेल्या सदर मागणीच्या अनुषंगाने पाठपुराव्याला यश आले असून त्यासाठी तेरा कोटी एकोणसत्तर लक्ष पंच्याऐशी हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन राज्य शासनाने नमूद केल्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने निधी मंजूर होण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी गतवर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात व चालूवर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी व कपात सूचना उपस्थित करून निधी मंजूर करण्याची मागणी लावून धरली होती.
पंढरपूर शहर हे भारताच्या अध्यात्मिक शहरापैकी एक महत्वपूर्ण शहर आहे. दरवर्षी परमात्मा श्री विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक पंढरीत येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधा अन्वये सदर मागणी लवकरात - लवकर मार्गी लागणे अतिशय गरजेचे असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी पत्रात म्हटले होते. तसेच सद्य काळात रुग्णांच्या सेवेत असणारे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे आरोग्य कक्षेतील भौतिक सुविधांच्या अन्वये तोकडे असल्यामुळे याचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत आ. समाधान आवताडे हे सतत कृतिशील मार्गाने पाठपुरावा करत होते.
आ. समाधान आवताडे यांनी पत्रात नमूद केलेल्या सर्व बाबींचा विचार करून पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या प्रभावशाली आरोग्य सुविधेसाठी पंढरपूर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन येणाऱ्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पमध्ये निधीची तरतूद करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी असेही आ. समाधान आवताडे यांनी पत्रात नमूद केले होते, त्यांच्या या मागणीला या माध्यमातून खूप मोठे यश प्राप्त झाल्याने मतदारसंघातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा