कला व वाणिज्य महाविद्यालय कडेपूर येथे "आझादी का अमृत महोत्सव"
शिवशाही वृत्तसेवा, कराड
कडेगांव दि. 7- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव केवळ उत्सवी स्वरुपात साजरा न करता क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, हुतात्म्यांचे बलिदान व त्यांच्या त्यागाच्या, आत्मसमर्पण च्या कथा समाजासमोर आल्या पाहिजेत त्यातूनच आजच्या पिढीला देशभक्तीचे धडे मिळतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी सदानंद माळी यांनी केले.
ते कला व वाणिज्य महाविद्यालय कडेपूर येथे "आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत" मराठी विभागाच्या वतीने क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बापूराव पवार हे होते. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. दिलीप पवार, पत्रकार हेमंत व्यास उपस्थित होते.
तडसर गावचे दिवंगत कवी पांडुरंग माळी गुरुजी यांनी साठ कवितेमधून स्वतंत्र वीरांच्या शौर्याच्या कथा समर गीतात साकारल्या आहेत. त्यांच्या या कविता स्वातंत्र्यविरांच्या व्यक्तीमत्वावर आधारलेल्या आहेत. म्हणून त्यांचे सुपुत्र जेष्ठ कवी सदानंद माळी यांनी त्या स्वातंत्र्यवीरांच्या कविता क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा गायनाचा रुपाने समोर आणला असून त्याचा शुभारंभ मराठी विभागाने आयोजित केलेल्या "क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा" स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात करण्यात आला.
ज्येष्ठ कवी सदानंद माळी बोलताना पुढे म्हणाले की, क्रांतिकारकांनी राष्ट्रासाठी जे बलिदान दिले. त्यांनी केलेला त्याग व समर्पणाची भावना आजच्या पिढीला कळावी म्हणून गावोगावी क्रांतिकारकांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करणार असल्याचे स़ागत क्रांतिकारकांच्यावर लिहिलेल्या तेजस्वी कविता सादर करून दाखविल्या. आपल्या कविता सादरीकरणामधून त्यांनी क्रांतीकारकांची व्यक्तिमत्त्वे समोर उभी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य बापूराव पवार म्हणाले की, क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा जोपर्यंत आपल्या कानावर पडणार नाहीत तोपर्यंत आपणास स्वातंत्र्याची किंमत कळणार नाही. आपणास जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागातून बलिदानातून व आत्मसमर्पणातून मिळाले आहे. क्रांतिकारकांचे हे आत्मसमर्पण आपल्या समोर येणे गरजेचे आहे. आज देशामध्ये भौतिक प्रगती बरोबरच सामाजिक प्रगतीही होणे गरजेचे आहे क्रांतिकारकांचे स्मरण करून जातिभेद, धर्मभेद, भाषाभेद यासारख्या समाजविघातक प्रवृत्तींना आळा घातला तरच खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याचे सार्थक होईल.
प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक प्रा. कुमार इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजया पवार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सुरेश डूरेपाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा