श्री संत दामाजी महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय परिषदेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात नॅशनल कॉन्फरन्स घेण्यात आली होती यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून तसेच तालुक्यामधून विद्यापीठातून शोध निबंध पाठवण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणाली फडवणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली दामाजी महाविद्यालयाचे सर्वच पदाधिकारी, रतनचंद शहा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन बी पवार सर ,सचिव किसन मामा गवळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील एडवोकेट रमेश जोशी , प्राध्यापक डॉक्टर संजय क्षीरसागर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
शिक्षण हेच राष्ट्रबांधणीचे प्रभावी साधन : कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस
मंगळवेढा प्रतिनिधी राज सारवडे
"राष्ट्राच्या बांधणीची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. इतिहासाचे विस्मरण होणे हे धोकादायक आहे. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक साच्यातून शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे." "शिक्षक, पालक आणि बालक हे राष्ट्र बांधणीचे पिलर आहेत. शिक्षणाकडे बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद व्हायला हवी. आर्थिक पाठबळ मिळायला हवे.शिक्षण आणि आरोग्य हे राष्ट्र बांधण्याचे निकष आहेत," असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पुढे बोलताना केले. त्या श्री विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या आजादी का अमृत महोत्सव आणि राष्ट्रबांधणी या विषयावर आंतरशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था समन्वयक राहुल शहा होते. डॉ.फडणवीस पुढे म्हणाल्या की, 'कौशल्याधारित आवडीनुसार, गरजेनुसार अभ्यासक्रम निर्माण करणे हेच राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक आहे. समाजशास्त्र असो वैज्ञानिक असो हे सुद्धा राष्ट्रबांधणीमध्ये अत्यंत उपयुक्त असे घटक आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी भारताने प्रगती केली असली तरी आरोग्य, शिक्षण, शेती,औद्योगिकरण, प्रदूषण हे प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत. परदेशी कंपन्यांचे अतिक्रमण थोपवणे गरजेचे आहे. भारत हा बुद्धांचा देश आहे आणि त्याने जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे हेही आपण लक्षात ठेवायला हवे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना राहुल शहा म्हणाले की "त्या त्या कालखंडातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडीतून राष्ट्राची बांधणी होत असते. आधुनिकीकरणाच्या गतिमान वेगाने भारतीय संस्कृतीमधील मूल्ये हरवत चाललेली आहेत की काय अशी भीती वाटते आहे. आधुनिक प्रसार माध्यमांनी भारतातल्या नव्या पिढीवर अतिशय वाईट परिणाम केले आहेत. वाईट गोष्टींचे फॉलोवर्स वाढले आहेत. हे राष्ट्राच्या निर्मितीसाठी घातक आहे. सोशिकपणा चांगला पण अती सोशिकपणा वाईटच. या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे आणि हे फक्त शिक्षण करू शकते. त्यासाठी आपण दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे."
या परिषदेच्या उद्घाटनाच्या प्रास्ताविकामध्ये पाहुण्यांचा परिचय आणि आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने मागची भूमिका प्राचार्य प्रोफे. डॉ.पवार एन.बी यांनी विशद केली. त्यांनी भारतीय संस्कृतीमधील श्रेष्ठ मूल्यांची थोरवी आणि भारताच्या प्रगतीमधील शेतकरी आणि सैनिक यांचे योगदान अधोरेखित केले.
बीजभाषण सत्रात एस.एस. आर्ट्स अँड टि.पी.सायन्स संकेश्वर बेळगावीचे प्रोफेसर डॉ. बालगौडा पाटील हे होते "लोकशाहीचे बळकटी करण हेच राष्ट्रबांधणीसाठीे महत्वाचे आहे. सरकारी धोरणांची समीक्षा करणे यातून भारत वैचारिक दृष्ट्या आत्मनिर्भर होऊ शकतो. राज्यघटना ही राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते आहे." असे प्रतिपादन केले. तर या सत्राचे अध्यक्षीय भाषणात स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ. विश्वनाथ आवड म्हणाले की "भारतीय राजकारणातील गुन्हेगारी, पैशाचा वापर, स्त्रियांचा राजकारणातील नगण्य सहभाग, नैतिक अधःपतन, प्रसार माध्यमांची लोकशाही विरोधी भूमिका हे राष्ट्र बांधणीसाठी घातक आहे."
शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा
दुसऱ्या सत्राचे साधनव्यक्ती प्रोफे. डॉ. रवींद्र भणगे, विभागप्रमुख, पॉलिटिकल सायन्स, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांनी भारतीय लोकशाहीची वाटचाल आणि आव्हाने या विषयावर बोलताना लोकशाही शासन प्रणाली व मानसिकता रुजविण्यातील ब्रिटिशांचे योगदान, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनाने लोकशाहीची घडलेली भूमिका आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या भारतातील पहिल्या नेतृत्वाने दिलेले योगदान अधोरेखित केले. पण अलीकडच्या काळातील राजकीय लोकांचे आध:पतन, शहरी लोकांचा निवडणुकीतील अपुरा सहभाग, उदासीन वृत्ती लोकशाहीस घातक आहे असे प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्ष प्रोफे. डॉ. सिद्राम सलवदे (अध्यक्ष, राज्यशास्त्र अभ्यासक्रम मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर) यांनी सध्याच्या ढासळलेल्या राजकारणाची नोंद घेतली.
तिसऱ्या सत्रातील साधनव्यक्ती डॉ. शाम लेंडवे ( विभाग प्रमुख, पॉलिटिकल सायन्स, शिवाजी कॉलेज, रेणापूर, लातूर) यांनी समकालीन राजकारणातील जातीयता, धर्मांधता, सामान्यांचे प्रश्न न सोडण्याची राजकारणातील वृत्ती याचा शोध घेतला. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ.पंडित लावंड (शिवाजी महाविद्यालय, बार्शी) यांनी लोकशाहीतील मूल्यव्यवस्था या विषयावर भाष्य केले. सत्याग्रह, अहिंसा, समता, सामाजिक न्याय या गोष्टी लोकशाही आणि राष्ट्रबांधणीसाठी आवश्यक आहेत असे प्रतिपादन केले. या परिषदेच्या शेवटच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफे. प्राचार्य डॉ. दत्तात्रेय तिकटे ( अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर), उपस्थित होते. त्यांनी अतिशय उपरोधिक भाषेमध्ये सध्याच्या राजकारणातील अपप्रवृत्तींवर भाष्य केले. मानव निर्देशांक तफावत, विकासाच्या फसव्या जाहिराती, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारी घट आणि सर्वांना सोबत घेऊन विकास कधी होणार असे प्रश्न उपस्थित केले. ॲड.रमेश जोशी म्हणाले की राष्ट्र प्रथम ही भावना आज विरत चालली आहे. जातिधारित धर्माधिष्ठित व्यक्ती मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. राष्ट्र आणि राष्ट्रपुरुष समजून घेण्यात आपण कमी पडलो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.पवार एन.बी. म्हणाले की राष्ट्रबांधणीसाठी राज्यघटना, लोकशाही, शिक्षण ,आरोग्य हे तर महत्त्वाचे आहेच पण त्याहुनही या सगळ्यात लोकांचा लोकशाहीतील सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे आभार परिषद समन्वयक प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी केलेे. परिषदेचे सूत्रसंचालन दत्ता सरगर यांनी केले. या परिषदेसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक व नॅक समन्वयक प्रा. डॉ. होनराव पी. एम. , संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव किसन गवळी, प्रा.डॉ. सुशिल कुमार शिंदे, डॉ. दिलीपकुमार क्षिरसागर, (आझाद महाविद्यालय, औसा), प्रा. अवधूत बोरकर (अमरावती), उपस्थित होते. याप्रसंगी आजादी का अमृत महोत्सव या विषयावर विविध संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी लिहिलेल्या शोध निबंधाचे यूजीसी केअर लिस्ट जर्नल्सचे प्रकाशन ही करण्यात आले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा