नंतर तिने जे केले, त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही
शिवशाही वृत्तसेवा कल्याण
पैसा ही अशी गोष्ट आहे , जी प्रत्येकाला हवी असते. मग ती कष्टातून प्रामाणिकपणे मिळो, अथवा वाममार्गाने. काही लोक तर पैसा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. मात्र आपल्या समाजात असे काही लोक आहेत जे कष्ट करून प्रामाणिकपणे पैसे मिळतात, आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आयत्या मिळालेल्या किंवा चुकीच्या मार्गाने मिळालेल्या पैशाकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. अशा लोकांचा समाजात नेहमीच आदर केला जातो. प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या एका गरीब महिलेने, असेच प्रामाणिकपणाचे उदाहरण जगासमोर ठेवत, तब्बल दोन लाख रुपये किमतीची सोन्याची वस्तू, संबंधित इसमाला परत केली आहे.
कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात 60 वर्षीय जाहीदा शेख या आपल्या कुटुंबासह राहतात. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या झाडू, सुपल्या, गाळण्या, वगैरे प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचा ठेला चालवतात. त्यांच्या दुकानासमोर त्यांना एक सोन्याचे ब्रेसलेट सापडले. या ब्रेसलेट ची किंमत जवळपास दोन लाख रुपये इतकी होती. परंतु जाहिदा यांनी त्या सोन्याचा मोह न ठेवता, ते ब्रेसलेट संबंधित इसमाला परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला. ब्रेसलेट सापडल्यावर त्यांनी तातडीने, तिथे असलेल्या वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळाने एक तरुण ब्रेसलेट शोधत त्या ठिकाणी आला. तेव्हा जाहिदा शेख यांनी, ते ब्रेसलेट आपल्याला सापडले होते. आणि आपण ते पोलिसांकडे दिले, असल्याची माहिती त्या तरुणाला दिली. त्या तरुणाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी शहानिशा करून हे ब्रेसलेट त्याच तरुणाचे आहे, याची खात्री करून, ते तरुणाच्या हवाली केले. महागडे ब्रेसलेट परत मिळाल्याचा आनंद त्या तरुणाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जाहिदा शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा