रवि सोनार स्नेह परिवाराचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
वाढत्या शहरीकरणामुळे आणि भौतिक सुखाच्या भोगवादामुळे प्रत्येक शहर व गावामध्ये सिमेंटच्या घरांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर परिसरातील झाडांची संख्याही कमी होत चालली आहे. त्यामुळे निसर्गातील पक्ष्यांच्या घरट्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. निसर्गचक्राचा एक महत्वाचा भाग असलेल्या चिमण्या व इतर पक्ष्यांचा किलबिलाट दुरापास्त होत चालला आहे. म्हणून येथील दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे कर्मचारी आणि कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या माध्यमातून पक्षीप्रेमी व्यक्तिंना जागतिक चिमणी दिनी घरट्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार, दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक रशीदभाई मुलाणी, गणेश चौधरी, सतीश घोडके यांनी विशेष परिश्रम घेऊन कागदी पुठ्ठ्यांच्या नळ्यांपासून पर्यावरणपूरक एक्कावन घरटी बनवली आहेत. हे घरटे घराबाहेर स्लॅबखाली किंवा छताखाली अडकवल्यास चिमणी या घरट्याचा वापर निवाऱ्यासाठी अथवा अंडी घालून उबवून प्रजननासाठी करू शकेल. या वैशिष्ट्यपूर्ण घरट्यांमध्ये उन, वारा, पाऊस यापासून तसेच इतर संभाव्य धोक्यांपासून चिमण्यांची पिल्ले सुरक्षित राहू शकतील आणि त्यामुळेच निसर्गचक्राच्या नैसर्गिक अधिवासात चिमण्यांची संख्या वाढण्यास हातभार लागेल असे सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार आणि त्यांच्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग सेंटरच्या सहकाऱ्यांना वाटते. ज्या पक्षी प्रेमींना घरटे हवे आहे त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार (9922514300) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक चिमणी दिवसाच्या औचित्याने राबविण्यात येत असलेल्या घरटे वाटप उपक्रमाचे पंढरपूर आणि परिसरातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींकडून स्वागत व कौतुक होत आहे. तसेच असे निसर्ग संवर्धक उपक्रम अधिकाधिक व्यक्ति तसेच संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात यावेत अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा