संतांचे विचार म्हणजे मानवी जीवनसागरातील दीपस्तंभ - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
सर्व संतांचे विचार आणि शिकवण ही मानवी जीवनसागरातील दीपस्तंभच आहे. त्यामुळे एकूणच संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे. असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांतर्गत संत साहित्य ग्रंथ स्नेहभेट कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - एकूणच मानवी जीवनात सर्वांनीच संतांचे विचार आणि शिकवण यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन निश्चितच सुखावह होईल.
येथील महाद्वार परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या गाभाऱ्यात श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या वतीने संत साहित्याचे अभ्यासक श्री संत नामदेव महाराजांचे वंशज श्री. कृष्णदास नामदास महाराज, वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रामकृष्ण वीर महाराज, कीर्तनकार श्री. सूर्याजी भोसले महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेचे श्री. रामेश्वर जाधव महाराज आणि ज्योतिषशास्त्र अभ्यासक श्री. राधेश बादले-पाटील यांना संत शिरोमणी श्री नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांची विस्तृत माहिती असलेले संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे चरित्र, सकल माहिती विशेषांक तसेच हरितारण ग्रंथ असे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ स्नेहभेट स्वरुपात देण्यात आले. अध्यात्मिक उपक्रमांतर्गत संत साहित्य प्रसार आणि प्रचार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा