"लतादीदींनी गीतांच्या माध्यमातून कोट्यवधी श्रोत्यांना आनंद दिला" - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
“लतादीदींनी वेगवेगळ्या भाषांमधून हजारो वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण गीतांच्या माध्यमातून जगभरातील संगीत क्षेत्रातील कोट्यवधी श्रोत्यांना अविस्मरणीय असा आनंद दिला आहे. गानसम्राज्ञी लतादीदींच्या जाण्याने जगभरातील संगीत क्षेत्रामध्ये कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे. ” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना बोलत होते. मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना श्रवणासाठी रेडिओचे संच देऊन श्रद्धांजली वाहून पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ मानवी जीवनात रेडिओ हे एक बहुआयामी श्रवणयंत्र असून या रेडीओच्या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना वर्षानुवर्षे बातम्या, लघुनाटिका, नाटिका, समालोचन, चर्चासत्र या व अशा इतर कार्यक्रमांबरोबरच लतादीदींची असंख्य कर्णमधुर, सुश्राव्य आणि अवीट गाणी ऐकावयास मिळतील.”
कवी रवि वसंत सोनार स्नेह परिवाराच्या वतीने जागतिक रेडिओ दिनी गोपाळपूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित प्रख्यात संगीतकार श्री. विनोद शेंडगे म्हणाले की, “भारतातील अनेक संत, साहित्यिक आणि गीतकारांची गाणी जगभरात पोहोचवण्याचे कार्य गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले आहे.” तर प्रसिद्ध व्याखाते श्री. सोमनाथ गायकवाड लतादीदींना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की - “ आजवर लतादीदींनी जगभरातील सर्व रसिक श्रोत्यांचे कान मंत्रमुग्ध केलेले आहेत. कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या रेडिओच्या माध्यमातून लतादीदींची असंख्य गाणी ऐकूण मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या मनाला नक्कीच प्रसन्नता मिळेल.”
मातोश्री वृद्धाश्रमात गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सौ. वैशाली शेंडगे, सौ. कविता गायकवाड, सौ. सविता सोनार, कु. रेवती सोनार, सामाजिक कार्यकर्ते श्री. ओंकार कापसे, स्वाद फुडचे उद्योजक श्री. संजय कुलकर्णी, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री. राक्षे आणि ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा