स्वतः आनंदी असताना परिसरातील उपेक्षितांना आनंदी करण्याचा प्रयत्न आवश्यक - रवि वसंत सोनार.
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
“ प्रत्येक व्यक्तिने आपल्या जीवनातील आनंदाच्या प्रसंगी आपल्या सभोवताली असणाऱ्या वंचित आणि उपेक्षितांना आनंदी करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्यिक, अध्यात्मिक, वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, संगीत आणि सामाजिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता रवि सोनार यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात फलाहार वाटप कार्यक्रम प्रसंगी पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ अनेकांच्या जीवनात सण, उत्सव, जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस हे व असे अनेक आनंदाचे प्रसंग येत असतात. आपल्या आनंदामध्ये सभोवतालच्या परिसरातील वंचित, उपेक्षित व गरजवंतांना सहभागी करून घेतल्यास आपला आनंद द्विगुणित होईल.”
येथील मातोश्री वृद्धाश्रमात कवी रवि वसंत सोनार स्नेह परिवाराच्या वतीने दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक रशीद मुलाणी, सौ. शहनाज मुलाणी, गणेश चौधरी, सौ. गौरी चौधरी, सतीश घोडके व सौ. स्वाती घोडके यांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ स्त्री पुरुषांना द्राक्षे, संत्री, दाळिंब, चिक्कू आणि केळी या फळांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा