सोनार दांपत्यांकडून प्रवाशांना चरित्रग्रंथांची स्नेहभेट
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
“ संत आणि महापुरुष यांचे चरित्र हे प्रत्येक व्यक्तिसाठी वाचनीय तसेच संस्कारक्षम आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने पंढरपूर बस स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील मराठी साहित्य रसिक प्रवाशांना संत व महापुरुष यांचे चरित्रग्रंथ ग्रंथ स्नेहभेट देण्याच्या कार्यक्रमात पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ मराठी साहित्य रसिक वाचकांना मराठी भाषेतील संत साहित्य तसेच महापुरुषांचे चरित्र ही व अशी पुस्तके वाचायला दिल्यास वाचक अशी पुस्तके आवडीने वाचतील. यामुळे वाचन संस्कृती तर वाढीस लागेलच शिवाय वाचकांच्या मनावर सकारात्मक व प्रभावी सुसंस्कार होतील.”
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने पंढरपूर बस स्थानकावर संपन्न झालेल्या या उपक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यापक विद्यालयाचे श्री धनंजय पंधे सर, डेपो मॅनेजर श्री सुधीर सुतार, श्री रत्नाकर लाड, पंकज तोंडे, कवी सचिन कुलकर्णी आदी मान्यवर व महाराष्ट्राच्या विविध भागातील साहित्य रसिक प्रवासी उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर विभागातील बस स्थानकावर मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना श्री पंधे सर यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला तर श्री. सुधीर सुतार यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. कवी सचिन कुलकर्णी यांनी सुश्राव्य अशा काव्यरचना सादर केल्या. मराठी भाषा दिन औचित्याने कवी रवि सोनार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक कर्मचारी व प्रवाशांना संत आणि महापुरुष यांचे चरित्रग्रंथ स्नेहभेट स्वरुपात देऊन साहित्य वाचनाची पर्वणीच उपलब्ध करून दिली.
पंढरपूर बस स्थानकावर संपन्न झालेल्या मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहन शिंदे यांनी केले. तर श्री रत्नाकर लाड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सोनार दांपत्यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी केलेल्या या उपक्रमामुळे पंढरपूर आणि परिसरात त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा