शिवजयंतीच्या मुहूर्तावर मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुण यांचा विवाहसोहळा
शिवशाही वृत्तसेवा जुन्नर
अल्फिया जमादार आणि अक्षय राऊत विवाह बंधनात
खऱ्या प्रेमाला जात-पात, धर्म या कशाचेही बंधन मान्य नसते. त्यामुळे दोन जीव जेव्हा एकमेकांच्या प्रेमात गुंतले जातात, तेव्हा समाजाच्या मानवनिर्मित बंधनांवर आणि भेदांवर मात करून, प्रेमाचा विजय होतो.
छत्रपती शिवरायांची जन्मभूमी जुन्नरमध्ये असाच प्रेमाची ताकद अधोरेखित करणारा प्रेमविवाह, शिवजयंतीच्या मुहूर्तावर संपन्न झाला आहे. धर्माच्या आणि भेदांच्या भिंती ओलांडून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची सध्या राज्यभर चर्चा आहे.
जुन्नर तालुक्यात जन्मलेली अल्फिया जमादार, ही मुस्लिम तरुणी आणि अक्षय राऊत हा हिंदु तरुण यांचे प्रेम जुळले. सुखी संसाराची स्वप्ने पहात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अल्फियाच्या घरून या लग्नास तीव्र विरोध झाला. मात्र या दोन प्रेमी जीवांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर, 20 फेब्रुवारी रोजी नऱ्हेगाव येथे विवाह केला. छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवुन, हिंदू रितीरिवाजाप्रमाणे हा विवाह संपन्न झाला. लग्नाच्या वेळी अल्फियाच्या वडिलांनी विवाहस्थळी येऊन गोंधळ घातला. आणि वधू अल्फिया आणि वर अक्षय यांना मारहाण देखील केली. मात्र ते दोघे आपल्या निर्णयावरून विचलित झाले नाहीत.
"मी जुन्नर तालुक्यात जन्म घेतला असून छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितल्याप्रमाणे, प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे, जोडीदार निवडण्याचे आणि धर्माचरण करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. मुलगी सज्ञान झाल्यावर तिच्या आवडी-निवडी महत्त्वाच्या असतात. मला माझा जोडीदार साथ देणारा आणि समजून घेणारा हवा होता. म्हणून मी प्रेम विवाह केला," असे अल्फिया म्हणते. वडिलांनी मारहाण केल्यानंतर अल्फिया व अक्षय यांनी महिला आयोगाकडे तक्रार करून, संरक्षण मागितले आहे.
धर्मावर मात करून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला असंख्य शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे या विवाहामुळे कोणत्याही जाती धर्मांच्या भेदांवर, प्रेम मात करू शकते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा