ज्ञानेश्वर कल्याणकर या शेतकऱ्याने जुन्या बाईक पासून बनवली हायटेक इलेक्ट्रिक बाइक
शिवशाही वृत्तसेवा नांदेड
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे आपण सारेच त्रस्त आहोत. कार अथवा मोटरसायकल वापरणे अनेकांना त्यामुळे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून काही जण इलेक्ट्रिक बाइक चा वापर करण्याचा विचार करतात. पण या इलेक्ट्रिक बाइक फारच महाग असतात. तसेच त्यांचा देखभाल खर्चही खूप जास्त असतो. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढत असल्या तरी, सगळेच नाईलाजाने कार आणि बाईक वापरतात.
नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यावर स्वस्त पर्याय दिला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ३० वर्षीय तरुण शेतकरी ज्ञानेश्वर कल्याणकर याने जुन्या बाईकला जुगाड करून इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे. एकदा चार तास चार्जिंग केल्यावर ही बाईक शंभर किलोमीटर धावते. चार्जिंग करण्याकरता फक्त १४ रुपये खर्च येतो. म्हणजेच ही बाइक 14 रुपयात 100 किलो मीटर धावते . ज्ञानेश्वर कल्याणकर याने सुमारे 40 हजार रुपयात ही इलेक्ट्रिक बाइक बनवली आहे. साधारण सव्वीस हजार ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान अशा आणखी बाईक तयार करता येतील असे ज्ञानेश्वर ने सांगितले
नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव या गावात राहणारा रॅन्चो म्हणजेच ज्ञानेश्वर कल्याणकर हा पारंपारिक पद्धतीने फुलांची शेती करतो. फुलांच्या वाहतुकीसाठी येणारा खर्च परवडत नसल्याने, त्याला या बाईकची कल्पना सुचली. आता तो याच इलेक्ट्रिक बाइक वरून, फुले विकण्यासाठी बाजारात जातो. त्याची बाईक पाहण्यासाठी परिसरातील लोक पिंपळगावला येत आहेत. अनेकांनी अशी बाईक बनवून घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा